तयारीला लागा…महापालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार?

मुंबई : राज्यात १४ महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने या परिपत्रकात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने हे परिपत्रक जारी केले आहे. आजच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान मध्य प्रदेश सरकारला झटका देत त्या राज्यातदेखील स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जाहीर करण्यास सांगितले आहे.

ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि राज्य सरकारने निवडणुका घेण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रलंबित निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय लवकरच या निवडणुका होणार असे चित्र निर्माण झाले आहे. पावसाळ्यात महापालिकेच्या निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे त्या सप्टेंबरमध्ये होतील काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रक्रियेला वेग
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुकांच्या कामाला राज्य निवडणूक आयोगाकडून गती देण्यात येत आहे. १० मार्च २०२२ ला राज्य सरकारने कायदा करत प्रभाग रचना निश्चित करण्याचे अधिकार सरकारकडे घेतले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता पुन्हा राज्य निवडणूक आयोगच प्रभाग रचना जाहीर करणार आहे. १४ महापालिकांच्या निवडणुकीची प्रभागरचना जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १७ मे ही तारीख निश्चित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास दोन आठवड्याचा वेळ दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या कामांना गती दिली आहे.

१४ महापालिकांची प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार

राज्यातील १४ महापालिकांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली या महापालिकांची मुदत संपली आहे. या महापालिकांची प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी १२ जूनला होणार आहे. तोपर्यंत राज्य सरकार ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डाटा तयार करुन सादर करणार का हे पाहावं लागणार आहे.

आठवड्याभरात आरक्षण जाहीर होणार
१७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुढील आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्याच वेळी मतदार याद्या फोडून त्यावर हरकती, सूचनांची कार्यवाही पुढील १० दिवसात होऊ शकते. त्यामुळे जूनमध्ये निवडणूक होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Share