वयाची ऐंशी ओलांडलेल्या हेलन करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना हेलन यांचे नाव न ऐकलेली क्वचितच एखादी व्यक्ती असेल. हेलन यांनी आपल्या नृत्याच्या जोरावर सर्वांचीच मनं जिंकली. वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरदेखील हेलन आजही चित्रपटात काम करण्यासाठी तितक्याच उत्साही असून, आता त्या ‘ब्राउन’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करीत आहेत.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनय देव यांच्या ‘ब्राउन’ चित्रपटामध्ये हेलन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हेलन यांच्याबरोबरच अभिनेत्री करिश्मा कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल. हा चित्रपट अभिक बरुआ यांच्या ‘सिटी ऑफ डेथ’ या पुस्तकावर आधारित आहे. कोलकता या शहराची पार्श्वभूमी या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. तसेच सूर्य शर्मा देखील या चित्रपटामध्ये काम करताना दिसतील.

https://www.instagram.com/p/Cce4iB0so2q/?utm_source=ig_web_copy_link

‘ब्राउन’ चित्रपटामधील आपल्या भूमिकेविषयी बोलताना हेलन म्हणाल्या की, “जेव्हा पहिल्यांदा मला या चित्रपटाबाबत विचारण्यात आलं तेव्हा या चित्रपटाच्या टीमला माझ्या भूमिकेबाबत कितपत स्पष्टता आहे हे मला कळालं होतं. मी या भूमिकेचा अभ्यास केला आणि पुन्हा एकदा सेटवर परतल्यावर आपलं काम स्वतः एण्जॉय करायचं ठरवलं”.

”मी जेव्हा शेवटचं चित्रपटामध्ये काम केलं आणि पुन्हा तिथेच परत आल्यावर कितपत बदल झाले आहेत हे पाहून मी हैराण झाले; पण सगळे बदल पाहून मला खूप बरं वाटलं. कारण आता जे काम होत आहे हे मी याआधी कधीच अनुभवलं नाही”, असे त्यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/Cce5LRlrBYJ/?utm_source=ig_web_copy_link

हेलन यांना वयाच्या १९ व्या वर्षीच चित्रपटसृष्टीमध्ये मोठा ब्रेक मिळाला. ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातून हेलन यांच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हेलन यांचे भरीव योगदान आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिल्यानंतर हेलन बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्या. हेलन यांनी तब्बल ७०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये कमबॅक करण्यास त्या सज्ज झाल्या आहेत. वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरही हेलन यांची काम करण्याची जिद्द खरंच कौतुकास्पद आहे. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्या रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. हेलन यांचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन होत असल्याने त्यांचे चाहते आनंदित झाले आहेत.

Share