मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोस दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात २० उद्योगांसमवेत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे करार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, दावोसमधून काय येतं ते माहीत नाही. तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळवून नेले ते आणा. वेदांत, एअरबससारखे प्रकल्प गेले. दोन लाख कोटीच्यावरची गुंतवणूक तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी घेऊन या, असं संजय राऊत म्हणाले.
दावोसचे करार कसे होतात हे आम्हाला माहीत आहे. तिकडे जगभरातून राज्यकर्ते येतात. आपले करारमदार करतात. मग तुम्ही सांगता पाच लाख कोटीचे करार झाले, दहा लाख कोटींचे करार झाले. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी दावोसला जाऊन किती कोटीचे करार केले ते प्रुव्ह करू शकले नाही, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. फॉक्सकॉन वेदांता असेल, ड्रग्स पार्क असेल, एअर बस हे प्रकल्प महाराष्ट्रात आले होते. ते तुमच्यासमोरून कुणी तरी खेचून नेले. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा. गुजरातने नेलेले प्रकल्प महाराष्ट्रात घेऊन या, असा हल्लाही त्यांनी चढवला.