औरंगाबादकरांसाठी खुशखबर, हर्सुल तलावातून आता १० एमएलडी पाण्याचा उपसा

औरंगाबाद : शहरातील पाण्याच्या प्रश्नावर मार्ग काढत मनपाने हर्सुल तलावातून नवीन पाईपलाईन टाकली आहे. याद्वारे शहराला अतिरीक्त १० एमएलडी पाणी मिळणार आहे. यामुळे सिडको परिसरावरील ताण कमी झाला असून, जुन्या शहरातील १४ वॉर्डांनादेखील पुरेसे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनपातर्फे हर्सूल तलावापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३५० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीची चाचणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. त्यानंतर मंगळवारीदेखील चाचणीवर लक्ष ठेवण्यात आले. चाचणी यशस्वी झाल्यावर वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. जलवाहिनीच्या चाचणीच्या पहिल्या दिवशी साडेतीन एमएलडी पाणी वाढले होते. आता पूर्णपणे पाच एमएलडी पाणी वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हर्सूल तलावातून पूर्वी साडेचार एमएलडी पाणी मिळत होते. जलवाहिनी टाकल्यानंतर आता दहा एमएलडी पाणी मिळणार आहे. सिडको एन-७ येथील जलकुंभातून हर्सूल जलकुंभासाठी केला जाणारा पाच एमएलडी पाणीपुरवठा आता थांबवला जाणार असून, तो सिडको भागासाठी वळवला जाणार आहे. तलावातून वाढवण्यात आलेले पाच एमएलडी पाणी हर्सूल जलकुंभात सोडले जाणार असून, त्या माध्यमातून हर्सूल गावासह जुन्या शहरातील १४ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. सिडको एन-७ पाण्याच्या टाकीवरून इतर भागाला पाच एमएलडी पाणी दिले जाते. आता हर्सूल तलावातून पाणी वाढल्याने सिडको-हडकोवरील पाच एमएलडी पाण्याचा ताण कमी होणार आहे.

Share