एकनाथ शिंदेंना CM बनवण्याची किंमत गुजरातने वेदांत-फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल केली

मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळतं आहेत. या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय नेत्यांमध्ये वाद व्हायला लागले आहेत. वेदांत-फॉक्सकॉन महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी वेदांत-फॉक्सकॉनशी योग्य संवाद व चर्चा सुरू केली होती आणि तळेगावचे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने वेदांत- फॉक्सकॉनला सर्वोत्तम प्राधान्य दिले होते. वेदांत- फॉक्सकॉनसह व्यवसायाच्या संधीची वाट पाहणाऱ्या अनेक लहान उद्योजकांची साखळी आता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
नव्याने स्थापन झालेल्या ईडी सरकारला महाराष्ट्रात हा प्रकल्प कायम ठेवता आला नाही ही लाजिरवाणी गोष्ट असून मुख्यमंत्री शिंदे यांची राज्याच्या विकासाबाबतची उदासीन वृत्ती दिसून येते. त्यांनी गुजरातला बळी पडून महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान आणि लाखो इच्छूक तरुणांचे रोजगार बुडवले आहेत, असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बंडाचे समर्थन करण्यात व्यस्त असून रोजगार आणि औद्योगिकीकरणासारख्या विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला. महाराष्ट्रातील जनतेला तरुणांचे रोजगार घालवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.
Share