गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले आहे. गुणरत्न सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर १०९ आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयात सरकारची बाजू वकिल प्रदीप घरत यांनी न्यायालयात बाजू मांडली. गुणरत्न सदावर्ते यांच्या भाषणांचा उल्लेख त्यांनी न्यायालयात केला. भाषणात सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका आणि चिथावणीखोर भाषणाचाही युक्तिवादात विधिज्ञ घरत यांनी उल्लेख केला. सदावर्ते यांनी आंदोलकांची माथी भडकावण्याचे काम आहे असेही त्यांनी न्यायालयात सांगत या हल्ल्यात पोलिस जखमी झाले त्यामुळे गुणरत्न सदावर्तें यांना १४  दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली.

दरम्यान सदावर्ते यांचे वकील विधिज्ञ वासवानी यांनी या कोठडीला विरोध केला आहे. सदावर्ते घटनास्थळी नव्हते, सीसीटीव्हीतही ते दिसत नाहीत त्यांचा या प्रकरणाशी संबंधच नाही. पण गृहमंत्र्यांविरूद्ध तक्रार केल्याने या प्रकरणात सदावर्ते यांना गोवण्यात आले. काल झालेल्या घटनेत जखमी झालेल्यांचा अहवाल न्यायालयात सादर का झाला नाही असा सवालही वासवानी यांनी करीत न्यायालयापुढे त्यांची बाजू मांडली आहे.तर जयश्री पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आलेले आरोप  अंदाजपंचे आहेत अस त्यांनी म्हटलय.

१०९   एसटी कर्मचाऱ्यांची विधिज्ञ संदीप गायकवाड यांनी न्यायालयात बाजू मांडली. हे कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही ते गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करीत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर महिला आंदोलकांना न्यायालयाने विचारणा केली की, पोलिसांबद्दल आपली काही तक्रार आहे का यावर पोलिसांबद्दल कोणतीही तक्रार नाही असे महिलांनी सांगितले आहे.

Share