गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखील वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आक्रमकपणे आंदोलन केल्याप्रकरणी ११० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात आज सरकारी वकिलांसह सदावर्ते यांचे वकील तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

सदावर्ते त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हते, ते मॅट कोर्टात होते, तसंच आंदोलनात घरात घुसून आंदोलन करा वगैरे कुठेही बोललो नाही, असंही वासवानी यांनी सांगितलं. तर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील संदीप गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना सांगितलं की कोर्टाने या कर्मचाऱ्यांचा उद्देश समजून घेतला पाहिजे. एसटी कर्मचारी आरोपी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत, ते आंदोलक आहेत, गेल्या पाच महिन्यांपासून घरदार सोडून ते आंदोलनाला बसले आहेत.

यावेळी सरकारची बाजू मांडणारे वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल झालेले कलम गंभीर असून त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. तर सदावर्तेंनीच कामगारांना शरद पवारांच्या घराबाहेर आक्रमकपणे आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले असा आरोपही केला. तर त्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी सादर केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गोष्टी बदलून लिहिल्याचा आरोप केला आहे, तसंच सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीसही देण्यात आली नाही, असा दावा केला.

Share