‘हर हर महादेव’, जाणून घ्या महाशिवरात्रीची पूजा, शुभ मुहूर्त

Maha Shivratri : आज महाशिवरात्री महाशिवरात्री हा एक पवित्र हिंदू सण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच १ मार्च रोजी (आज) साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक करण्याचे वर्णन विविध ग्रंथ आणि पुराणांमध्ये आढळते. धार्मिक दृष्टिकोनातून अशीही एक धारणा आहे की महाशिवरात्रीला उपवास केल्याने योग्य जोडीदार मिळतो. महादेव महाशिवरात्रीचे व्रत ठेवणाऱ्यांना आर्थिक आणि कौटुंबिक सर्व समस्यांपासून वाचवतात.

महा शिवरात्री महत्त्व
हिंदू पौराणिक कथांनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. धर्मग्रंथानुसार लक्ष्मी, इंद्राणी, सरस्वती, गायत्री, सावित्री, सीता, पार्वती आणि रती या देवताही शिवरात्रीचे व्रत करतात. म्हणूनच भगवान शिवाचे भक्त शिवसाठी दिवसभर उपवास करतात. अविवाहित स्त्रिया चांगला वर मिळावा म्हणून व्रत ठेवतात, तर विवाहित स्त्रिया आपल्या नातेसंबंधात शांतता प्रेम समृद्धी आरोग्य इत्यादीच्या कामने साठी व्रत करतात.

या पद्धतीने करा भगवान शंकराची पूजा
सर्वप्रथम आपल्या रोजच्या कामातून विश्रांती घेतल्यानंतर तुम्ही कोणत्याही शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करू शकता. कोणत्याही तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडी साखर, गुलाबाची पाने टाकून भगवान महादेवाला स्नान घालावे. त्यानंतर तूप, दूध, मध, गंगाजल, साखर टाकून पंचामृत अभिषेक करावा. त्यानंतर रोळी, माऊली, अक्षत म्हणजेच फुले, सुपारी, लवंग, वेलची, चंदन, कमळ, धतुरा, बेलपत्र, इत्यादी भगवान शंकराला अर्पण करा. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणाचे पठण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

महाशिवरात्रीचा मुहूर्त

महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त ३ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होईल आणि बुधवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत असेल. रात्रीची पूजा संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी ते रात्री १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत चालणार आहे. शिवरात्रीच्या रात्री चार पहर पूजा केली जाते.

महाशिवरात्री चार प्रहर पूजाविधी वेळ

  • पहिला प्रहर: १ मार्च २०२२ संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून रात्री ९ वाजून २७ मिनिटांपर्यंत
  • दुसरा प्रहर: १ मार्च २०२२ रात्री ९ वाजून २७ मिनिटे ते १२ वाजून ३३ मिनिटे
  • तिसरा प्रहर: १ मार्च रात्री १२ वाजून ३३ मिनिटे ते पहाटे ३ वाजून ३९ मिनिटे
  • चौथा प्रहर: २ मार्च पहाटे ३ वाजून ३९ मिनिटे ते सकाळी ६ वाजून ४५ मिनिटे
  • व्रताची शुभ मुहूर्त: २ मार्च २०२२, बुधवार संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील

असा करा उपास
महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी केवळ एक वेळा जेवण करा. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांनी उपास करायचा संकल्प करावा आणि हा संकल्प यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी देवाचा आशीर्वाद घ्यावा.

या मंत्राचा जप करा
ॐ हौं जूं सः
महा मृतुन्जय मंत्र…
ॐ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टि-वर्धनम उर्वारुकमिव बन्धनं मृत्योर्मुक्षीय मामृतात

Share