राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर राजद्रोहाच्या व इतर आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात उद्या, शनिवारी सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर इतर प्रकरणांमुळे आज सुनावणी घेणे शक्य नसल्याने उद्या (शनिवारी) सुनावणी होईल, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले आहे.

राणा दाम्पत्याच्या जामिनाला पोलिसांकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामिनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असे राज्य सरकारकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांचा विशेष उल्लेखही राज्य सरकारकडून या उत्तरात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मुलुंड पोलिस ठाण्यातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राणा दाम्पत्याला जामीन देऊ नये, असे राज्य सरकारने यामध्ये म्हटले आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्याकडून वकील आबाद पोंडा बाजू मांडत आहेत, तर सरकारच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत हे काम पाहत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी गेल्या शनिवारी अटक केली होती. धार्मिक कारण पुढे करून दोन गटांमध्ये वैमनस्य वाढवणे व एकोप्याला बाधा निर्माण केल्याप्रकरणी उपेंद्र लोकेगावकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध १५३ अ, १२४ अ (राजद्रोह), ३४ भादंवि सहकलम ३७ (१ ), १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यांत राणा दाम्पत्याला त्यांच्या खार येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याला फटकारले होते.

https://twitter.com/barandbench/status/1519915870251667456?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519915870251667456%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2Fmumbai%2F170356%2Fmumbai-court-is-likely-to-hear-the-application-filed-by-navneet-rana-and-ravi-rana-seeking-bail-in-hanuman-chalisa-recitation-case-tomorrow%2Far

दरम्यान, जामीन मिळावा यासाठी राणा दाम्पत्याने न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज प्रलंबित असताना आणि त्यावर सुनावणी होणे बाकी असतानाही त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या जामीन अर्जावर आज (शुक्रवार) सुनावणी होणार नाही. उद्या (शनिवार) त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, असे सांगत पोलिसांकडून त्यांना जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे राणा दाम्पत्याला उद्या जामीन मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share