पाकला मोदींच्या काश्मीर दौऱ्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्या पाकिस्तानला भारतानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानला पंतप्रधान मोदींच्या काश्मीर दौऱ्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी काश्मीरला भेट देत सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या दौऱ्यादरम्यान, मोदी यांनी रॅटल अँड क्वार या हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प चिनाब नदीकिनारी किश्तवर येथे उभारण्यात येत आहे. हा ५,३०० कोटींचा प्रकल्प असून, त्याच नदीवर उभारण्यात येणारा क्वार हा प्रकल्प ४,५०० कोटींचा आहे. या प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमावर पाकिस्तानने टीका केली आहे. रॅटल हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाच्या बांधणीसंदर्भात पाकिस्तानसोबत वाद सुरू आहे, तर क्वार प्रकल्पासाठी भारताने इंडस वॉटर कराराचे पालन केलेले नाही आणि पाकिस्तानला माहिती कळवलेली नाही. अशा दोन प्रकल्पांची पायाभरणी भारतीय पंतप्रधानांनी करणे हे इंडस वॉटर कराराचे उल्लंघन आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानने पंतप्रधान मोदींच्या काश्मीर दौऱ्यावर टिपण्णी केल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याविषयी भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे जम्मू-काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे स्वागत झाले आणि जम्मू काश्मीरमध्ये जे बदल झाले हेच पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. यासोबतच बागची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्यावरही टीका केली आहे.

अरिंदम बागची म्हणाले, मला वाटते, पाकिस्तानला जम्मू-काश्मीरमध्ये जे घडतंय त्याविषयी काहीही बोलण्याचा अधिकार नाही; पण मी या दौऱ्यावर आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचं उत्तर देत आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी जम्मू-काश्मीरला भेट दिली. राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने त्यांनी ही भेट दिली असून, देशभरातल्या ग्रामसभांना संबोधितही केले. कलम ३७० हटवल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी २० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली.

Share