हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचा होणार सत्कार

औरंगाबाद : सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी जनजागृती म्हणून पोलिस आयुक्त कार्यालयामार्फत हेल्मेटचा वापर करणाऱ्या दहा दुचाकीस्वारांचा दर आ‌ठवड्याला सत्कार करण्यात येणार आहे. सोमवार दि.२८ मार्चपासून हा उपक्रम सुरू करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी दिली आहे.

वाहतुक पोलिसांकडून हेल्मेटचा वापर करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांचे २८ मार्चपासून महत्त्वाच्या चौकात फोटोग्राफ घेतले जातील. दर आठवड्यास अशा फोटोंमधून सोडत पद्धतीने दहा दुचाकीस्वारांची निवड केली जाईल. प्रत्येक आठवड्यात अशा नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

राज्य परिवहन मंडळ आणि पोलिसांनी हेल्मेटविषयी जनजागृती करावी, त्यानंतर कारवाई करावी असे असे आदेश देण्यात आले आहेत. हेल्मेट सक्तीसाठी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी 22 मार्च रोजी हे आदेश काढले आहेत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक अशा प्रत्येक दुचाकी चालकाला हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नये, हेल्मेट नसल्यास कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनातर्फेही हेल्मेटचा वापर वाढण्यासाठी प्रबोधन सुरु करावे, असे सांगण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांनाह सहभागी करून घ्यावे आणि त्यानंतर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.

 

Share