हेल्मेट सक्तीची वेळच येऊ देता कामा नये : निखिल पिंगळे

लातूर : हेल्मेटचा वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि परिवाराच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लातूरच्या सुजाण नागरिकांनी पोलीस प्रशासनाला हेल्मेटच्या वापरासाठी सक्ती करण्याची वेळच येऊ देत कामा नये असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.

माझं लातूर परिवार, राधिका ट्रॅव्हल्स आणि लातूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रसार माध्यमात कार्यरत सहकाऱ्यांसाठी हेल्मेट वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षपदावरून पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे बोलत होते.

यावेळी उप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, पत्रकार अरुण समुद्रे, अभय मिरजकर, जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी आनंद ऐनवाड, आदित्य भुतडा.राधिका डेव्हलपर्सचे संचालक शाम तोष्णीवाल, सुनील देशपांडे, महेंद्र पारडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांत प्राधान्याने तरुण युवकांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे. आजमितीस हेल्मेटचा वापर करणाऱ्यांची संख्या अत्यंत नगण्य आहे. हेल्मेट दुचाकी चालकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे. मात्र त्याचा वापर करा असे सांगण्याची वेळ प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनावर येते ही बाब योग्य नाही. स्वतःच्या आणि परिवाराच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जागरूक नागरिकाने किमान यापुढील काळात तरी नियमितपणे हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करून स्वयंशिस्त पाळावी अशी अपेक्षा पिंगळे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपरत्न निलंगेकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी माझं लातूर परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या तसेच यापुढील काळात हाती घेत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share