बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कसे बसता?

गुवाहाटी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे .साबणे यांचा हा व्हिडीओ शिंदे यांनी ट्वीट केल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

माजी आमदार सुभाष साबणे व्हिडीओत म्हटलं की, उद्धव ठाकरेंनी मी बोबड्याच्या बाजूला मांडी घालून बसू का? अशी विचारणा केली. पण ज्यांनी शिवेसनाप्रमुखांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसता…ते तुम्हाला चालतं, शिवसेनाप्रमुखांवरील प्रेमामुळे आम्ही एक वर्ष निलंबित होतो. आजही शिवसेनेबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. एकनाथ शिंदे माझं दैवत आहे म्हणूनच त्यांच्या बंडाला पाठिंबा दिला. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहावं तरच शिवसेना आणि महाराष्ट्र टिकेल, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टातील याचिकेत घेतला आहे. ३८ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. शिवसेना नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचंही याचिकेत सांगण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.

Share