मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन याची आजी आणि प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांची सासू पद्मा राणी ओमप्रकाश यांचे गुरुवारी (१६ जून) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पद्मा राणी ओमप्रकाश अनेक दिवसांपासून आजारी होत्या आणि बराच वेळ अंथरुणाला खिळून होत्या. गुरुवारी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. आज (शुक्रवार) पद्मा राणी यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी तसेच मनोरंजन विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. पद्मा राणी या चित्रपट निर्माते जे. ओमप्रकाश यांच्या पत्नी होत्या. प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांच्या त्या मातोश्री होत. पद्मा गेल्या दोन वर्षांपासून रोशन कुटुंबासोबत राहत होत्या. त्या वयाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या.
ह्रतिकच्या आजोबांचे म्हणजेच जे. ओमप्रकाश यांचे ७ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले होते. जे ओमप्रकाश यांनी १९७४ मध्ये राजेश खन्ना यांच्या ‘आप की कसम’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आप की कसम, अर्पण, अपनापन, आशा आणि आदमी खिलौना है या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांनी ‘आई मिलन की बेला (१९६४), ‘आस का पंछी (१९६१), ‘आये दिन बहार के (१९६६)’, ‘आंखे आंखे में’ आणि ‘आया सावन झूम के (१९६९) सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. २००४ मध्ये त्यांना एशियन गिल्ड ऑफ लंडनने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. पती जे. ओमप्रकाश यांच्या निधनानंतर पद्मा राणी गेल्या काही वर्षांपासून रोशन कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांची मुलगी आणि हृतिक रोशनची आई पिंकी रोशन या अनेकदा त्यांच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होत्या. पिंकी यांनी पद्मा राणी यांचे निधन झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिले होते, ”माझी आई पद्मा राणी ओमप्रकाश ही आम्हाला सोडून गेली. प्रेम, शांती आणि कृतज्ञ.’ अनेकांनी पिंकी रोशन यांच्या पोस्टाला कमेंट करुन पद्मा राणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पद्मा राणी यांचे जावई राकेश रोशन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पद्मा राणी यांना आदरांजली वाहिली आहे. हृतिक रोशनचे त्याच्या आजीसोबत म्हणजे पद्मा राणी यांच्यासोबत खूपच खास बॉन्डिंग होते. पद्मा राणी यांच्या निधनानंतर रोशन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.