लग्न मंडपात पोहोचताच हृता दुर्गुळेला अश्रू झाले अनावर

‘मन उडू उडू झालं’ आणि ‘फुलपाखरू’ या लोकप्रिय टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक ‘महाराष्ट्राची क्रश’देखील म्हणतात. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर ही अभिनेत्री तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. आपल्या अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या हृता दुर्गुळे हिने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हृता दुर्गुळे हिने गुपचूप प्रतीक शहाबरोबर लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. सध्या सोशल मीडियावर हृताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती भावुक झालेली पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना हृता दुर्गुळेच्या लग्नाची उत्सुकता होती. डिसेंबर महिन्यात हृताने प्रतीक शहाबरोबर साखरपुडा केला होता. हृता लग्न कधी करतेय? तिचा वेडिंग लुक कसा असणार? हे सर्व जाणून घेण्यासाठी चाहते आतुर होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. हृताने काल म्हणजेच १८ मे रोजी मुंबईमध्ये तिचा बॉयफ्रेंड आणि दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्न करत सगळ्यांनाच गोड बातमी दिली आहे. हृताने गुपचूप लग्न करत सर्वांनाच चकित केले आहे. सध्या सोशल मीडियावर हृता आणि प्रतीकच्या लग्नाचे अनेक फोटो आणि काही व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ मात्र फारच खास आहे.

हृताचा लग्नादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पिवळ्या रंगाची साडी, मुंडावळ्या, पारंपरिक दागिने असा हृताचा महाराष्ट्रीयन लूक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हृता भावुक झालेली या व्हिडीओमध्ये दिसते. तसेच तिला या सुखद क्षणी अश्रूदेखील अनावर होताना दिसत आहेत. हृताला पाहून तिच्या आई-वडिलांचे डोळे पाणावलेले या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत. तिचा हा सुंदर व्हिडीओ मेकअप आर्टिस्ट निशी गोडबोले हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CdtQlS5pk3Q/?utm_source=ig_web_copy_link

हृता पारंपरिक लूकमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. इतर मुलींप्रमाणेच हृतासाठीदेखील हा क्षण तिच्या आयुष्यामधील सर्वात सुंदर क्षण होता. हृता-प्रतीकने अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. काही तासांमध्येच त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये हृताच्या भांगेत कुंकू, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. हृताचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा भावुक होत आहेत. तसेच तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Share