‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून हृता दुर्गुळेची एक्झिट

मुंबई : छोट्या पडद्यावरून प्रसारित होणाऱ्या ‘मन उडू उडू झालं’ या लोकप्रिय मालिकेमध्ये दीपू ही भूमिका साकारत असलेली हृता दुर्गुळे हिने ही मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हृताने घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

झिंगाट प्रेमाची कहाणी असलेली ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत इंद्रा आणि दीपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. इंद्रा आणि दीपू या दोन्ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये विशेष करून युवा वर्गामध्ये खूपच लोकप्रिय आहेत. अभिनेते अरुण नलावडे हे दीपूच्या वडिलांची भूमिका या मालिकेत साकारत आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखले जाते. हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. हृता ही सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दीपूची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे हृता ही चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. मात्र, नुकतेच हृताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर येत आहे.

ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निर्मात्यांसोबत हृता दुर्गुळे हिचे भांडण झाले होते. या मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने त्यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात आहे. हा वाद सध्या विकोपाला गेला आहे. यामुळेच हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. हृताच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. हृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी करार केला होता. त्या करारानुसार तिला एक महिन्याचा नोटीस पीरियड पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच तिला ही मालिका सोडता येणार आहे. दरम्यान, हृताने अद्याप याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच आता तिच्या जागी या मालिकेतील दीपू ही भूमिका कोण साकारणार, असा प्रश्नही विचारला जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

https://www.instagram.com/p/CXAnj2_oVGv/?utm_source=ig_web_copy_link

हृताचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स
छोट्या पडद्याबरोबरच हृता दुर्गुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर हृताचे दोन मीलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या हृताने मास मीडिया या पदवी अभ्यासक्रमातील जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. हृता दुर्गुळे ‘दुर्वा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकली होती. या मालिकेने जवळपास हजार भागांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर ती ‘फुलपाखरू’ मालिकेत मुख्य भूमिकेत होती. या मालिकेपासून तरुणाईमध्ये तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.

Share