सातारा : संजय राऊत कोण मला माहीत नाही. मी राऊतांना ओळखत नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही; पण आमच्याबद्दल आणि राजघराण्याबद्दल जर कोणी वाईट बोलले तर आम्ही काही हातात बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. जशास तसे उत्तर देऊ, काय बाकीच पेटले तरी चालेल, असा इशारा भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. गुरुवारी सातारा येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजेंनी आपल्या खास स्टाईलमध्ये कॉलर उडवत हे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या पहिलवानांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बुलेट मोटरसायकल व इतर बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत कोण आहेत, मला माहीत नाही, अशा शब्दांत त्यांनी राऊंताची खिल्ली उडवली. आयडेंटीटी नसलेल्या लोकांबद्दल काय बोलणार. हे लोक मला माहितीच नाहीत तर त्यांच्याबाबत मी काय बोलणार? असे उदयनराजे म्हणाले.
संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन
मध्यंतरी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय हा संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करू नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मते द्यायला पाहिजे होती, असे राऊत यांनी म्हटले होते. तसेच संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ‘मावळ्यांमुळे छत्रपती असतात’, असे म्हणत राऊत यांनी छत्रपतींच्या राजकीय पक्षातील प्रवेशाबाबत वक्तव्य केले होते. यावर छत्रपती घराण्याचे वारसदार खा. उदयनराजे भोसले यांनी तेव्हा कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, गुरुवारी सातारा येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करताना खा. उदयनराजे भोसले संजय राऊत यांच्यावर चांगलेच भडकले. त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन, अशी धमकीच उदयनराजे यांनी स्टेजवरून दिली.
सध्या राजकारणात सुरू असलेल्या कुस्त्या अगदी चिल्लर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने रंगलेल्या राजकारणावर खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी भाष्य केले. सध्या राज्यात कोणत्या कुस्त्या चालल्या आहेत, हे कळत नाही. मात्र, या कुस्त्या चिल्लर आहेत, असे ते म्हणाले. आज राजेशाही नाही, लोकशाही आहे. या लोकशाहीत तुम्ही राजे आहात. मात्र, लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार कोणत्याही पक्षातील असू द्या. पक्षबिक्ष आपण मानत नाही. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी थोडा विचार करायला पाहिजे. आपल्याला लोकांनी निवडून दिले आहे. सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील लोकांचे संरक्षण करायला पाहिजे. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. सध्या राजकारणात सुरू असलेल्या कुस्त्या या अगदी चिल्लर आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले.
खऱ्या कुस्त्या तर मातीतल्या आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक स्कीम आहेत. या माध्यमातून कुस्तीपटू आणि खेळाडूंना नक्की फायदा करून देईन. मगाशी माझा उल्लेख कोणीतरी ट्रिपल केसरी म्हणून केला, त्यांच्या मनात काय होते हे मला माहिती नाही; पण ट्रिपल करण्यासारखे अजून माझे वय काय एवढे झालेले नाही, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
दरम्यान, याच कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उपविजेता प्रकाश बनकर आणि इतर गटातील विजेत्या पैलवानांचा सत्कारा खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे करण्यात आला. यावेळी उदयनराजेंच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांना बुलेट तर प्रकाश बनकर यांना होंडा युनिकॉन ही गाडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.