बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही – संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखले झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच संजय राऊतांच्या घरी पोहोचले आहेत. यावर आता संजय राऊत यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट मध्ये म्हटलं की,कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र, अस ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीचे पथक आता त्यांच्या घरी दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.

Share