भगवी शाल द्याल असं वाटलं, पण त्याची मला काही गरज नाही -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज रविवारी मुंबईत शिवनेरी किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पार पडले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार टोला हाणला. मला भगव्या शालीची गरज नाही. मला जे काही बोलायचे आहे ते १४ तारखेच्या सभेत बोलेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमातळाबाहेर शिवनेरीच्या प्रतिकृतीचे उद्घाटन महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई. सचिन अहिर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात चुलत बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी स्वीकारलेल्या कट्टर हिंदुत्वाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भगव्या शालीचा संदर्भ देत, “अरविंदजी, आपण सत्कारावेळी मला भगवी शाल द्याल असं वाटलं, पण मला त्या शालीची गरज नाही”, असे म्हणत राज ठाकरेंचा उल्लेख न करता चिमटा काढला.

याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा. गत अनेक दिवसांपासून मुंबई विमानतळावर शिवनेरीची प्रतिकृती तयार करण्याचे आपले स्वप्न होते. ते आज पूर्ण झाले. शिवरायांचे दर्शन आपल्याला येताजाता होतंय. आपण कुठे आलो आहोत? जे परदेशातून आले आहेत त्यांना कळलं पाहिजे की आपण कुठे आलो आहोत, या शहराची ओळख काय, शहराचं मुंबई नाव कशावरुन पडलं, मुंबईची ग्रामदैवत मुंबा देवी, मुंबा आई उतरल्यानंतर तिचं दर्शन देतो. या शहरात उतरल्यानंतर मुंबा आईचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या शहरात पाऊल टाकावं, अशी आपली जी इच्छा होती ती आज साकार होत आहे. मुंबा आईला वंदन करून तिच्या मुंबई नगरीत या. मला खूप काही बोलायचे आहे; अनेक विषयांवर मतं मांडायची आहेत; पण आज काहीच बोलणार नाही. मला जे काही बोलायचे आहे ते येत्या १४ तारखेला मुंबईत बीकेसीच्या मैदानावर होणाऱ्या सभेत सविस्तर बोलेन, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला.

Share