महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मारक-पुतळ्यास माझा विरोध राहणारच : इम्तियाज जलील

औरंगाबाद : येथील स्मारकाऐवजी महिला व शिशुसाठी उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज ४०० खाटांचे रुग्णालयास लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव देण्यात यावे तसेच महाराष्ट्रात महापुरुषांचे स्मारक शासकीय निधीतुन उभारण्या ऐवजी त्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेसाठी अद्यावत रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व हॉस्टेल उभारण्याचे निर्देश संबंधितांना देवुन शिवसेना पक्षातील सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे स्मारक व पुतळयांचे बांधकाम लोकवर्गणीतुन करण्याचे सुचना देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मारक व पुतळ्यास माझा विरोध आहे व राहणारच मी माझ्या मतावर ठाम असुन स्मारक व पुतळ्याऐवजी त्या महापुरुष व लोकनेत्यांच्या नावाने सर्वसामान्य जनतेला लाभ मिळेल असे लोकोपयोगी प्रकल्पास माझा संपुर्ण पाठिंबा असणार असल्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात खासदार इम्तियाज जलील यांनी आपली भुमिका स्पष्टपणे मांडली.

पत्रात पुढे नमुद केले की, महाराष्ट्र राज्यात आजवर अनेक महापुरुष व लोकनेत्यांनी जन्म घेतलेला आहे. महापुरुष व लोकनेते यांनी आपल्या कामातुन एक नविन ओळख निर्माण करुन आपले संपुर्ण आयुष्य फक्त सर्वसामान्य जनतेच्या भवितव्यासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पणाला लावले होते. अशा महान महापुरुष व लोकनेते यांचे फक्त स्मारक व पुतळे उभारण्याऐवजी त्यांच्याच नावाने अद्यावत रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व हॉस्टेल उभारावे हिच या सर्वांना खरी श्रध्दांजली असणार आहे.

स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्मारक उभारुन काहीही साध्य होणार नसल्याने औरंगाबाद शासकीय दूथ डेअरी येथे उभारण्यात येणाऱ्या त्यांच्या स्मारकाला मी प्रखरतेने व आक्रमकतेने विरोध केला होता. स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांना खरी श्रध्दांजली म्हणजे रुग्णालय हेच असणार ! म्हणुन मी शासनाने घोषित केलेल्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याएवेजी सुसज्ज रुग्णालय उभारावे त्याकरिता मी आमदार असतांना विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. तसेच शासनाच्या विविध स्तरावर यशस्वी पाठपुरावा करुन सर्व सोयीसुविधासह रुग्णालय बांधण्यासाठी मी मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. इम्तियाज जलील विरुध्द महाराष्ट्र शासन याचिका क्रमांक ९९/२०१७ च्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयाने स्मारकाच्या जागेवर सुसज्ज महिला व शिशु रुग्णालय उभारण्याचे आदेश दिल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले.

आज स्मारकाऐवजी त्याच ठिकाणी सद्यस्थितीत ४०० खाटाच्या भव्य रुग्णालयाचे बांधकाम युध्दस्तरावर सुरु आहे. सबब बांधकामाचा मी वेळोवेळी आढावा घेवुन विहीत वेळेत गुणवत्तापुर्ण, दर्जात्मक व दोषमुक्त बांधकाम पुर्ण करण्याचे सुचना संबंधित विभागास करीत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

Share