पाऊले चालती पंढरीची वाट….आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

पुणे : ”बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’’ च्या गजरात सोमवारी देहूनगरी दुमदुमून गेली. टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, खांद्यावर भगवी पताका, पांढरा शुभ्र सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घातलेले लाखो वारकरी आणि दिंड्या-पताका अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास देहू नगरीतून लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखी सोहळ्यासोबत लाखो भाविकांचा महासागर पंढरीकडे रवाना झाला.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरला निघणारी पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना आषाढी वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेले वारकरी आता ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांमध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक आणि रुग्णवाहिकाही सोबत असणार आहे.

आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी विठूनामाच्या गजरात देहूनगरी दुमदुमून गेली होती. प्रारंभी देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्निक पादुकांचे पूजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार सुनील शेळके, त्यांच्या पत्नी सारिका शेळके, माजी आमदार उल्हास पवार, संजय भेगडे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार महापूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित वारकऱ्यांसह सर्व वैष्णवजन टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे,आदी उपस्थित होते.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून पंढरपूरकडे रवाना होताना वारकरी, भाविकांनी ज्ञानोबा-तुकोबारायांचा जयघोष केला. यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. महापूजेनंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले. हा पालखी सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामासाठी विसावला.

तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३७ वे वर्ष आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज अमाप उत्साहात पार पडला. वारकऱ्यांनी केलेला हरिनामाचा गजर आणि भागवत धर्माच्या फडकणाऱ्या पताकांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. मुख्य मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला होता. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालखी सोहळा प्रस्थानापूर्वीच संत तुकाराम महाराज संस्थानने मंदिर परिसरातील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यातही कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. कुठेही घातपाताची घटना घडणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

 

Share