लसीकरण न झाल्यास कटू निर्णय घ्यावा लागेल- छगन भुजबळ

नाशिक : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यात्रांवर बंदी राहिल. तसेच धार्मिक स्थळांमध्ये कोरोनाच्या सर्वं नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तेथील पुजारी, विश्वस्त यांची असेल. सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, याबाबतची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यात यावी. तसेच सर्व नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा धोका वाढू नये यासाठी स्वत: सोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन, शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पालकमंत्री छगन भूजबळ म्हणाले की, ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. तो वेळेत घ्यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसात वाढलेली रुग्णसंख्या पाहता लग्नसमारंभ साधेपणाने करण्यात यावे. तसेच समांरभामध्ये ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास महसूल व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तपणे संबंधित आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पहिला डोस घेतलेल्यांनी त्यांचा कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस वेळेत घ्यावा. अन्यथा वेळेत लसीकरण न झाल्यास ‘नो व्हॅक्सिनेशन, नो रेशन’ असा कटू निर्णय घ्यावा लागेल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

जिल्ह्याची कोरोना सद्यस्थितीची माहिती देतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. यामध्ये दरदिवसाला साधारण ३० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच साधारण ९ लाख लस जिल्ह्यात शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे मालेगावमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आजच्या स्थितीला मालेगावमध्ये ७० टक्के नागरिकांचा पहिला डोस तर ४२ टक्के नागकिांचा लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करण्यात आली असून, पुरेश्या प्रमाणात बेड्स व औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मालेगावमधील कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प असल्याने तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत अभ्यास गट गठित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिली.

Share