पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या भाजपाचा प्रोपगंडा फुटला – पटोले

मुंबई : पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीवरून देशात भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आले आहे. दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडिओ शेअर करत, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपाचा प्रोपगंडा फुटला. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपाचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. असं नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे. या, ट्विटसोबत पटोलेंनी व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा जात असलेल्या रस्त्याच्या कडेला उभा राहून भाजपा कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. या वेळी मोदींचा वाहन ताफा काही क्षण थांबल्याचेही दिसून येत आहे.

नेमकं काल काय घडलं?
बुधवारी मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर पंजाब सरकारने एसएसपीला निलंबित केलं होतं.

Share