हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा; उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सुनावले

मुंबई : बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव वापरू नका. स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, सेनेच्या बापाच्या नावे मागू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना सुनावले. आधी नाथ होते, आता दास झाले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज शनिवारी (२५ जून) मुंबई येथे शिवसेना भवनात झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. या बैठकीस शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा, महाराष्ट्रात वावरून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी काल बंडखोरांना दिले होते. त्यानंतर आज शिंदे गटाने ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असे आपल्या गटाचे नाव निश्चित केल्याचे वृत्त समोर आले. शिंदे गटाच्या नव्या नावाने उद्धव ठाकरे संतप्त झाले आहेत. काय तुमचे कर्तृत्व? हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, अशा परखड शब्दांत यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावले. उद्धव ठाकरे म्हणाले, बंडखोरांना काय तो निर्णय घेऊ द्या, मग आपण आपली रणनीती ठरवूयात. शिवसैनिकांनी अशीच एकजूट दाखवावी. आपण त्यांना धडा शिकवू. शिवसेना हा निखारा आहे, बंडखोरांनी पाय ठेवला तर जळून जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा पक्षांतर्गत नाराजीविषयी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्यांनी सांगितली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी तेव्हा बाळासाहेबांना म्हणालो होतो, हे सगळे काय करतायत, ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले, मी मध्ये नाही पडणार. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी सगळ्यांना विचारले होते की, हे जे सगळे केलेय, ते तुम्हाला मान्य आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आपल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचे काकणभर जास्तच प्रेम आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून अनेकांना मी सांगतो. तुम्ही हसाल; पण जर शिवसैनिकांना विचारले तर तो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्तच प्रेम करत असेल. कारण केवळ मी त्यांचा मुलगा आहे म्हणून, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे, रामदास कदम नेतेपदी कायम

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही मंत्री आणि आमदारांना फोडून केलेल्या बंडखोरीमुळे मागील पाच दिवस राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षात आता उभी फूट पडली असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ असे ४६ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हेदेखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. रामदास कदमदेखील शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. शिवसेनेच्या घटनेनुसार कार्यकारिणी बैठकीत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, त्यांना नेतेपदावरुन दूर सारले जाईल, अशी चर्चा रंगली होती; परंतु कार्यकारिणीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झाला नाही. तूर्तास एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना अभय देण्यात आले आहे. शिवसेनेत नेतेपद, सचिवपद अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम हे शिवसेना नेते पदावर आहेत. या दोघानांही नेतेपदावरुन हटवणे हा टोकाचा निर्णय आहे. जर त्यांच्यावर कारवाई करत त्यांची नेतेपदावरून हकालपट्टी केली असती, तर शिंदे गटाचे परतीचे दोन कापले गेले असते. त्यामुळेच त्यांना नेतेपदावर कायम ठेवून ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कार्यकारिणीतील सहकाऱ्यांनी घेतल्याचे दिसते.

दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापासून शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या वापरापर्यंत एकूण पाच महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे बंडखोर शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. या ठरावांमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याच्या शिंदे गटाच्या प्रयत्नाला अडथळा निर्माण होईल, असे मानले जात आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत झालेले पाच ठराव
१) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.
२) शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांना देत आहे.
३) बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव अन्य कुणालाही वापरता येणार नाही.
४) शिवसेना बाळासाहेब ठाकरे याची होती, आहे आणि कायम राहील.
५) शिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.

Share