एकनाथ शिंदेंसह १६ बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांची नोटीस; ४८ तासांचे अल्टिमेटम

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व पेच निर्माण झाला असून, राजकीय घडामोडींना वेग आला असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. त्याची दाखल घेत झिरवळ यांनी शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. बंडखोर आमदारांना नोटिशीला उत्तर देण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली असून, नोटिशीला उत्तर न दिल्यास या आमदारांना अपात्र ठरवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उघड-उघड दोन गट पडले असून, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे माघार घेण्यास तयार नसून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. या १६ आमदारांना येत्या ४८ तासांमध्ये उपस्थित राहून त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास या आमदारांना अपात्र ठरवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, भरत गोगावले, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, रमेश बोरणारे, अब्दुल सत्तर यांच्यासह १६ जणांची आमदारकी रद्द करावी, यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पत्र देण्यात आले होते. शिवसेना नेते अरविंद सावंत, अनिल देसाई, सुभाष देसाई यांनी काल विधिमंडळात विविध मुद्यांवर त्यांची बाजू मांडली होती. अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी बंडखोर आमदारांवर कारवाई करू नये, असे पत्र दिले होते. ते पत्र फेटाळण्यात आले आहे. शिवसेनेने केलेल्या मागणीची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली असून, त्यांना ४८ तासांचे अल्टिमेटम दिले आहे. आजपासून या १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या आमदारांना सोमवारी २७ जूनपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास अपात्र ठरवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या नोटिशीनंतर शिंदे गटातील आमदार न्यायालयात झिरवळ यांच्या नोटिशीला आव्हान देण्याची शक्यता आहे. या नोटिशीबद्दल बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला नोटीस देण्यात आली हे खरे आहे. काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना उत्तर दिले जाईल. निलंबन होणार नाही. कोर्टात जाण्याची वेळ आली तर ते करावे लागेल. आम्ही लांब आहोत, कोणालातरी घरी नोटीस दिली आहे. आम्ही अजूनही कोणत्या पक्षात गेलेलो नाही. पक्ष सोडलेला नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. बैठकीला का येऊ शकलो नाही त्याबद्दल उत्तरात सांगू. नोटिशीला उत्तर देऊ. एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. काळजीचे कारण नाही,” असे आ. भरत गोगावले यांनी सांगितले.

Share