खोटे सांगाल तर… बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा

ठाणे : महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही. आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्याचसोबत खोटे सांगाल तर भाजपची संघटना रस्त्यावर उतरून विरोध करेल असा इशारा दिला. ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासाच्या अंतर्गत ते भिवंडी येथे पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सत्ता गमावल्यानंतर आघाडीतील  घटक पक्ष सातत्याने चुकीची माहिती पेरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीक करत आहेत. युती सरकारचे जाणीवपूर्वक नुकसान करून प्रतिमा खराब करत आहेत. पण भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. खोटे सांगाल तर भाजपची संघटना रस्त्यावर उतरून खोट्याला विरोध करेल. महाविकास आघाडी सरकारन गेल्या अडीच वर्षात राज्याला बर्बाद केले, त्याबद्दलचे सत्य जनतेसमोर सांगू असं त्यांनी म्हटलं.

मविआत असंतोष उफाळून येईल
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शिबिरानंतर युती सरकार कोसळेल, असे  भाकित राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी वर्तविले आहे. त्याविषयी एका पत्रकारने प्रतिक्रिया विचारली असता बावनकुळे यांनी सांगितले की, केवळ भाजप दूर ठेवण्यासाठी आणि सत्ता मिळवून भ्रष्टाचार करण्यासाठी महाविकास आघाडीतील  घटक पक्ष एकत्र आले होते. आता त्यांना ध्यानात आले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे भक्कम बहुमत आहे. हे सरकार अधिकाधिक काम करेल, तसा या पक्षांमध्ये असंतोष उफाळून येईल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना थांबविण्यासाठी आणि आमदारांची अस्वस्थता कमी करण्यासाठी जयंत पाटील यांनी हे विधान केले आहे असा टोला लगावला.

सुषमा अंधारेंनी राजकीय उंची ओळखावी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापूर्वी फडणवीस यांनी राज्यासाठी केलेले अफाट कार्य, त्यांची राज्याच्या विकासाची व्हिजन, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचे उत्तुंग नेतृत्व याचा विचार करावा तसेच आपली राजकीय उंची किती याचाही विचार करावा असा टोला प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी लगावला आहे.

Share