उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर लगेच देवेंद्र फडणवीसांची मोठी सभा, महत्वाच्या मुद्द्यांवर करणार भाष्य

मुंबई : राज्यात आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर लगेचच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांची याआधी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबईच्या सौमय्या मैदानावर सभा झाली होती. त्यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे १४ मे रोजी सभा घेणार आहेत. पण त्यांच्या सभेनंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे आगामी सभेत देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची हिंदुत्ववादाची भूमिका आणि उत्तर भारतीयांच्या मुद्दांवरही महत्त्वाचं भाष्य करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढल्याचं चित्र आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी जावून भेट घेतल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका अंमलात आणण्याचा निर्धार केला. त्यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन थेट राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. राज ठाकरेंच्या या अल्टिमेटमचे पडसाद उत्तर प्रदेशातही बघायला मिळाले. उत्तर भारतातही अनेक मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यात आल्याची बातमी समोर आली होती. याशिवाय राज ठाकरे लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून राज ठाकरेंना विशेष संरक्षण दिलं जाणार आहे. राज ठाकरे यांची सर्व सुविधा उत्तर प्रदेश सरकारडून करण्यात येणार आहे. याशिवाय राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता भविष्यात भाजप-मनसे युती होईल का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Share