महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची अंमलबजावणी सुक्ष्म व योग्य नियोजनाद्वारे करा – जिल्हाधिकारी आर. विमला

नागपुर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्यानुषंगाने यात्रेची अंमलबजावणी सुक्ष्म व योग्य नियोजनद्वारे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ अंतर्गत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यांत्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या  दूरदुष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी आर. विमला व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांचा सहभाग होता तर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक पी. टी. देवतळे, उद्योग प्रतिनिधी जीवन घिमे, गुणवंत वासनिक, शेखर गजभिये, माविमचे राजू इंगळे, उद्योग विभागाचे ए. टी. पाटील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते.

खाजगी संस्थांमध्येही प्रशिक्षण

१७ ऑगस्ट रोजी नागपूर व नागपूर (ग्रामीण) येथे यात्रेचे प्रशिक्षण शासकीय आयटीआय व पॉलिटेक्निकमध्ये होणार आहे तर १८ ऑगस्टला हिंगणा व कळमेश्वर तालुक्यातील शासकीय आयटीआय व पॉलिटेक्निकमध्ये होणार आहे. त्यासोबतच खाजगी संस्थांमध्ये ही प्रशिक्षण होणार आहे. त्याचे नियोजन योग्य प्रकारे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नावीन्यतापूर्ण स्टार्टअप धोरणाच्या माध्यमातून स्टार्टअपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता इन्क्युवेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टाट्रअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टाट्रअप वीक संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

यात्रेची सुरुवात महाराज बागेपासून होणार

कृषी, शिक्षण, आरोग्य व उद्योग या क्षेत्रातील तज्ज्ञांना यासाठी आमंत्रित करा. माविमने महिला बचत गटाच्या महिलांना यात सहभागी करावे. त्यासोबतच औद्योगिक संघटना व बँकर्सचा यात समावेश करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या सादरीकरण स्पर्धेच्या वेळी हे तज्ज्ञ जज म्हणून असणार आहेत. यासाठी सर्व विभागाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेची सुरुवात महाराज बागेपासून होणार आहे. त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे जाईल. भौगोलिक परिस्थितीनुसार याचे नियोजन करुन यात्रेची यशस्वीता करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या. ही यात्रा १७ ते २६ पर्यंत जिल्ह्यात राहणार आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. १४ सप्टेंबरपर्यंत गुगल फार्म विद्यार्थ्यांना भरावयाचे आहे, असे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी सांगितले. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थ्यांना सहभागी करुन त्यांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे सहसंचालक पी. टी. देवतळे यांनी सांगितले.

Share