नवी दिल्ली : देशात २०१९ नंतर भारत-बांगलादेश सीमेवर घुसघोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जवळपास १४ हजार बांगलादेशी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या एका अहवालातून समोर आली आहे.
१ जानेवारी २०१९ ते २८ एप्रिल २०२२ पर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेवर ९ हजार २३३ बांगलादेशींना पकडण्यात आले. भारतात अवैध्यरित्या वास्तव्य केल्यानंतर पुन्हा बांगलादेशमध्ये परतत असतांना त्यांना पकडण्यात आले होते. या कालावधीत भारतामध्ये घुसघोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ४ हजार ८९६ बांगलादेशींना पकडण्यात आले. अशा प्रकारे एकूण १४ हजार ३६१ बांगलादेशी नागरिकांना सीमेवर पकडण्यात आल्याची माहिती बीएसएफकडून अहवालातून देण्यात आली आहे.
बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात प्रवेश करणारे अथवा पळणारे ८० टक्के अवैध प्रवासी बंगालच्या दक्षिण भागात असलेल्या कुंपण विरहित तसेच नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या सीमांमधून घुसखोरी करतात. दक्षिण बंगालची सीमा सुंदरबन ते मालदापर्यंत पसरली आहे, हे विशेष. बांगलादेशसोबत ४ हजार ९६ किलोमीटरची सीमा लागून आहे. दक्षिण बंगालची सीमा ९१३.३२ किलोमीटर आहे. यातील ५० टक्क्यांहून अधिक सीमेवर तारेचे कुंपण नाही तसेच काही भाग नदीकिनाऱ्यावर आहे. काही गाव सीमेवर आहेत. अशात सुरक्षा दलांना घुसखोरांना पकडण्यात समस्या येतात.
बांगलादेशी घुसखोर भारतात रोजगाराच्या शोधात येतात. डिसेंबर २०१९ मध्ये संसदेकडून नागरिकता संशोधन कायदा पारित झाल्यानंतर अवैध घुसखोरीत वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. २०२० मध्ये केवळ १ हजार २१४ बांगलादेशींनी भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला, तर ३ हजार ४६३ बांगलादेशी भारतातून पळून गेल्याची माहिती बीएसएफच्या अहवालात दिली आहे.