मोदी सरकारची मुंबईकरांना मोठी भेट! एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात

मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठी भेट दिली आहे. मुंबईतील एसी लोकल ट्रेनच्या भाड्यात कपात करण्याच्या निर्णय घेण्यात आला असून, भारतीय रेल्वे बोर्डाने याला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महागाईच्या काळात जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निम्म्या भाड्यात प्रवास करता येणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईतील भायखळा रेल्वेस्थानकातील एका कार्यक्रमात एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याची घोषणा केली. दानवे म्हणाले, मुंबईतील एसी लोकल ट्रेनच्या भाड्यात ५० टक्के कपात करण्याच्या निर्णयाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. आता तिकीट दर १३० रुपयांवरून ९० रुपयांवर पोहोचले आहेत. वेस्टर्न लाईन ते सेंट्रल लाईनपर्यंतचे भाडे किलोमीटरनुसार असेल.

देवेंद्र फडणवीस यांचयाकडून निर्णयाचे स्वागत

या निर्णयावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मुंबईतील एसी लोकलच्या तिकिटांची किंमत कमी करण्याची मागणी लोकांकडून होत होती. आता त्यात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दराबाबत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारचा दृष्टिकोन खूप छोटा आहे. भाजपचे सरकार असलेल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत; परंतु महाराष्ट्रात इंधनाचे दर जास्त आहेत.

मुंबईत सध्या लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. २६ एप्रिल रोजी येथील तापमान ३८.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. वाढत्या उन्हामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एसी लोकल ट्रेनची मागणी वाढली आहे. बहुतेक प्रवाशांना एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करायचा असतो. अशा परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमध्ये बसायला जागा मिळत नाही.
मुंबईकरांसाठी लाइफलाइन असलेली लोकल अपग्रेड करत पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सेवा सुरू केली होती; पण एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात होती. एसी लोकल सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असली तरी तिकीट दर जास्त असल्याने या लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. एसी लोकलचे तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनांकडूनही केली जात होती. अखेर ही मागणी आता पूर्ण करण्यात आली आहे.

Share