मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असताना अभिनेते शरद पोंक्षे आणि आदेश बांदेकर यांच्यातील ‘सोशल मीडिया वॉर’ची विशेष चर्चा सुरू आहे. शरद पोंक्षे यांनी बंडखोर शिवसेना नेते आ. एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यावर आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. बांदेकर यांनी केलेल्या टीकेला पोंक्षे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उत्तर दिले आहे.
टीव्ही मालिका, नाटक, चित्रपट या सर्वच माध्यमांवर आपल्या दमदार अभिनयाने छाप पाडणारे अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. शरद पोंक्षे यांनी कॅन्सरविरोधात यशस्वी झुंज दिली. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी होता. शिवसेनेच्या ३८ आमदारांना आपल्यासोबत घेऊन बंड पुकारणारे एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. याचदरम्यान अभिनेते शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये पोंक्षे यांनी शिंदे यांचा उल्लेख ‘मोठा भाऊ’ असा केला होता. या पोस्टनंतरच अभिनेते आदेश बांदेकर यांनी पोंक्षे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, त्यानंतर एक नवा वाद उफाळल्याचे दिसून आले.
https://www.instagram.com/p/CfMDIDdOiCE/?utm_source=ig_web_copy_link
ट्विटरवर पोस्ट करताना शरद पोंक्षे यांनी म्हटले होते की, ‘कर्करोगाशी लढताना मोठ्या भावासारखे शिंदेसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले.’ शरद पोंक्षे यांचे ‘दुसरे वादळ’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचा फोटो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले होते, ‘कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात ! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय. ‘दुसरं वादळ’ एका लढवय्या अभिनेत्याने कॅन्सरवर केलेली मात! एका झुंजीची गाथा! – शरद पोंक्षे, दोन महिन्यात दुसरी आवृत्ती!’ यावर आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शरद पोंक्षे यांनी दिलेल्या मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/tv/CfTmut9D–y/?utm_source=ig_web_copy_link
शरद पोंक्षे यांनी २०१९ साली एका वृत्तपत्राला दिलेल्या या मुलाखतीत त्यांच्या कर्करोगाच्या लढ्याविषयी सांगितले होते. या व्हिडीओत शरद पोंक्षे म्हणाले, “सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. आदेश म्हणाला कसली काळजी करू नकोस, मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता आहे असे ते सांगत आहेत. तर काय करू मला आता कळत नाही आहे. आदेश बांदेकर म्हणाले, काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली. तर अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.” आदेश बांदेकर यांनी हाच व्हिडीओ शेअर करत “हा शरद पोंक्षे तूच ना?” असा सवाल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आदेश बांदेकर यांच्या प्रश्नालाही आता शरद पोंक्षे यांनी चोख उत्तर दिले आहे. पोंक्षे यांनी बांदेकर यांच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत म्हटले आहे की, ‘मित्रा आदेश पुस्तक वाच. त्यात ज्याने ज्याने मदत केलेय त्या प्रत्येकाचे आभार मानलेत मी. मी तोच शरद पोंक्षे आहे प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा. मी कधीच काहीही विसरलेलो नाही. विसरणारही नाही. पक्षापलीकडची मैत्री आहे आपली. सोबत पुस्तकातला फोटो टाकत आहे.’ पोंक्षे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या ‘दुसरं वादळ’ पुस्तकाचे एक पान शेअर केले आहे. ज्यात त्यांनी आदेश बांदेकर यांच्यामुळे डॉ. आनंद नांदे यांची भेट कशी झाली याचा उल्लेख केला आहे.
यावेळी आदेश बांदेकर यांची स्तुती करताना शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे की, “असा हा आदेश, सहृदयी माणूस!” ही पोस्ट शेअर करत “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. यासोबतच त्यांनी आदेश बांदेकर यांना टॅगही केले आहे. शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही.@aadeshbandekar pic.twitter.com/292mrQ7dvk
— SHARAD PONKSHE (@ponkshes) June 27, 2022
आदेशचा गैरसमज झाला असणार : शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, आता या सोशल मीडियावरील वॉरवर शरद पोंक्षे आणि आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पोंक्षे यांनी म्हटले की, ‘आदेशचा गैरसमज झाला असणार. माझं ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यामध्ये माझ्या कॅन्सरसोबतच्या लढ्यात मदत करणाऱ्यांचे मी आभार मानले आहेत. परवा मी एकनाथ शिंदे यांची पोस्ट शेअर केलेली ती पोस्ट पाहून आदेशला असं वाटलेलं असेल की, मी फक्त एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. बाकी मी आदेशनं केलेली मदत किंवा उद्धव ठाकरे यांची मदत विसरलो असं त्याला वाटलं असेल तर हा गैरसमज आहे. आमच्यामध्ये वाद नाही, आदेश माझा मित्र आहे. तो माझ्यासाठी कायम माझा मित्र राहणार आहे. आपण काही वेळेला न वाचता रिअॅक्ट होतो. वाचून रिअॅक्ट व्हावं. आत्ता ज्या घटना सुरु आहेत, त्यावरुन लोकांनी टायमिंग जुळवलं असेल माझ्या डोक्यात असं काही नव्हतं. माझ्या पुस्तकात शिंदे साहेब, उद्धव ठाकरे यांचे फोटो आहे. कदाचित टायमिंगमुळे गैरसमज होऊ शकतो.’
आदेश बांदेकर म्हणाले, या प्रत्येक घटनेमागे क्रोनोलॉजी आहे
‘उद्धवसाहेब हे सर्वांची काळजी घेतात. हे सगळं कोणी पटकन कसं विसरू शकतं? पुस्तक प्रकाशित झालं होतं तर अशी वेगळी पोस्ट शेअर करणं आवश्यक होतं का? या प्रत्येक घटनेमागे क्रोनोलॉजी आहे. त्यावेळेला उद्धवसाहेबांनी फोन करून त्याची चौकशी करत होते. अशा वेळेला कसा विसर पडतो? मला ती पोस्ट पाहून वाईट वाटलं. मला गैरसमज होत नाही. पुस्तक वाचलं आहे की, नाही ते त्याला माहीत आहे की नाही? ही गोष्ट मला माहीत नाही. आजूबाजूला वातावरण आहे ते पाहता एखादी गोष्ट शांत करायची याबाबत विचारा करावा.’ असे आदेश बांदेकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.