मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठीच्या भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद लोकेश राहुलकडे सोपवण्यात आले आहे, तर या संघाचे उपकर्णधारपद हे रिषभ पंतकडे असेल. या संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांना संधी देण्यात आलेली नाही.
ऑलराऊंडर हार्दिक पंड्याबरोबर भारतीय संघात यावेळी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील धमाकेदार फॉर्म आणि आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक पाहता दिनेश कार्तिकला या संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच संघाची घोषणा केली आहे.
या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांना विश्रांती देण्यात येणार होती. त्यामुळे या संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या किंवा शिखर धवनकडे सोपवले जाईल, असे म्हटले जात होते; पण आता या मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद हे लोकेश राहुलकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर उपकर्णधार म्हणून रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार असून, या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये कोणते खेळाडू निवडले जाऊ शकतात याकडे सर्वांची उत्सुकता होती. अखेर बीसीसीआय व राष्ट्रीय निवड समितीने आज या मालिकेसाठी १७ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात शिखन धवनला संधी देण्यात आलेली नाही; पण या संघात आयपीएलमध्ये फॉर्मात नसलेल्या इशान किशनला मात्र स्थान देण्यात आले आहे.
सध्या हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असून, प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ आहे. आयपीएल-२०२२ मध्ये हार्दिकनेही दमदार कामगिरी केली आहे. कर्णधारपदाला साजेशी खेळी हार्दिकने या पर्वात केल्याने त्याला आता भारतीय संघातही संधी मिळाली आहे. गुजरात टायटन्सकडून खेळताना हार्दिक पंड्याने १३ सामन्यात ४१३ धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी ४१.३० असून, स्ट्राइक रेट १३१.५२ इतका आहे. यावेळी त्याने ४ अर्धशतके ठोकली असून, ८७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तम प्रकारे गोलंदाजीदेखील करत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ : लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार) दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.