इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर; चेतेश्वर पुजाराचे संघात पुनरागमन

मुंबई : भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची आज (रविवार) घोषणा केली आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौरा करणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून, उपकर्णधार म्हणून के. एल. राहुल याची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर या सामन्यासाठी पाच वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

या संघात काऊंटी क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने पुनरागमन केले आहे. याचबरोबर उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन वेगवान गोलंदाजांना देखील संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. गेल्या कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण इंग्लंड दौऱ्यातील या मालिकेसाठी संघाची निवड करताना चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आली आहे, तर अजिंक्य रहाणे हा संघाबाहेर असल्याचे पाहायला मिळत आहे.

माजी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. मात्र, विराट कोहलीलादेखील या संघात स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर संघात शुभमन गिल, हनुमा विहारी आणि के.एस. भारत यांचाही समावेश करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यातील अखेरचा सामना कोरोनामुळे रद्द करावा लागला होता. त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह काही जणांना कोरोना झाला होता आणि त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू हा सामना रद्द झाल्यावर आयपीएल खेळण्यासाठी थेट संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाले होते. त्यामुळे हा सामना पुढे होणार की नाही, याबाबत साशंकता होती; परंतु बीसीसीआय आणि इंग्लंडच्या क्रिकेट मंडळामध्ये यानंतर चर्चा झाली आणि हा सामना २०२२ साली खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा सामना आता खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघ अजून काही मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे; पण या संघांची घोषणा मात्र यावेळी करण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कोण कशी कामगिरी करतात, हे पाहिले जाईल आणि त्यानंतरच पुढचे पाऊल भारताची निवड समिती उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे.

भारतीय संघ पुढील प्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

Share