भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आरोपींना सहा वर्षांची शिक्षा

इंदौर-  इंदौरचे प्रसिद्ध भय्यू महाराज प्रकरणी दोषींना न्यायलयाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदौर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं असून त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ उडाली होती.

 

नेमकं प्रकरण काय?

इंदौर येथील अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःजवळ असलेल्या परवानाधारक पिस्तुलने गोळ्या झाडत आत्महत्या केली होती. सुरुवातीला कौटुंबिक कलह किंवा नैराश्य या दोन कारणांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी काही महिने आधीच त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यातून आपण आता निवृत्त होत आहोत, असे जाहीर केले होते.

या प्रकरणी इंदौर पोलिसांनी ३ जणांना अटक केली होती. यात एका तरुणीचाही समावेश होता. तसेच भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना देखील अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून लाखो रुपये उकळले, असा आरोप झाला होता.

२०१८ मधील जून महिन्यात भय्यू महाराज यांनी इंदौरमध्ये आत्महत्या केली होती. भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.

Share