सलग चार दिवस जाधव कुटुंबीयांची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबई – शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव आणि मुंबई पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची आयकर विभागाकडून सलग चौथ्या दिवशी चौकशी सुरु आहे. यातच आमदार यामिनी जाधव यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे.

चार दिवसांपूर्वी शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकले. आधी नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई आणि आता जाधव यांच्यावर आयकर विभागाचे छापे यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता महाविकास आघाडीतील नेत्यांवर झालेल्या या कारवाईमुळे आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, यशवंत जाधव यांच्या अडचणींत वाढ सुरुच आहे. चौथ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरू होती. अखेर काही वेळापूर्वी कागदपत्र आणि अन्य महत्वाची माहिती घेऊन सरकारी अधिकारी बाहेर पडले आहेत.

मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष- 

यशवंत जाधव हे सलग चार वेळा मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव आमदार आहेत. हा एक राजकीय विक्रम मानला जातो. शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर जाधव १९९७ मध्ये पहिल्यांदा, त्यानंतर २००७ मध्ये दुसऱ्यांना नगरसेवक म्हणून निवडून आले. २००८ मध्ये त्यांना सलग दोन वर्षे उद्यान आणि बाजार समितीचे अध्यक्षपद मिळाले.

२०१२ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या निवडून आल्या. मात्र, जाधव यांचा पराभव झाला. यामिनी महापौरपदाच्या स्पर्धेत होत्या. मात्र, त्यांना संधी नाकारण्यात आली. २०१९च्या निवडणुकीत यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या; तर २०१७ मध्ये यशवंत जाधव तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. पहिल्या वर्षी त्यांना शिवसेनेने सभागृह नेतेपद दिले. नंतर २०१८ पासून सलग चार वर्षे ते स्थायी समिती अध्यक्ष आहेत.

 

Share