हॅलो ऐवजी आता वंदे मातरम म्हणावं लागणार; सरकारनं काढला जीआर

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्”नी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री  मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘जनगणमन‘ हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्‘ हे राष्ट्रीय गाणं हे सर्वमान्य झालेले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर “वंदे मातरम्” हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

Share