९० दिवसांत मुंबईचा कायापालट करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य सरकराने येत्या ९० दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करून शहराचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत ४५० रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी’चा (२.०) शुभारंभ एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते. ‘स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर आहे. आता ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयानेच गाव आणि शहरांचा विकास होतो. महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. गावागावांत स्वच्छतेचे महत्त्वाचे काम करणारे स्वच्छतादूत हेच महाराष्ट्राचे खरे ब्रँड अँबेसिडर आहेत. देशात स्वच्छतेची चळवळ आता रुजली आहे. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा ठरत असून इच्छाशक्तीद्वारेच ही कामे साध्य होऊ शकणार आहेत. यापुढील काळात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावरही भर द्यावा लागेल. याद्वारे महापालिकांना उत्पन्नही मिळू शकेल,’ असे शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयानेच गाव आणि शहरांचा विकास होतो हे आपण पाहिले आहे. महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. गावागावांत स्वच्छतेचे महत्त्वाचे काम करणारे स्वच्छतादूत हेच महाराष्ट्राचे खरे ब्रँड अँबेसिडर आहेत. देशात स्वच्छतेची चळवळ आता रुजली आहे. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा ठरत असून इच्छाशक्तीद्वारेच ही कामे साध्य होऊ शकणार आहेत.

सर्व प्रकारचा कचरा ही आता समस्या नसून तो भांडवल ठरणार आहे. घनकचरा तसेच या सर्वच प्रकारच्या कचऱ्याच्या सुनियोजित व्यवस्थापनाद्वारे खतनिर्मिती आणि अन्य बाबीही उत्पादित होऊ शकतात. उल्हासनगर महापालिकेने राबविलेला गटार स्वच्छतेसाठीचा रोबो प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामुळे गटारांमध्ये उतरून स्वच्छता करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळत आहे. अशाच प्रकारची नाविन्यपूर्ण कामे या अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात यावीत. शिवाय अभियानातून होणारी कामे टिकाऊ आणि दर्जेदार पद्धतीचीच झाली पाहिजेत, अशी सूचना त्यांनी केली.

कचरामुक्तीव्दारे शहरांचा पूर्णपणे कायापालट करणार – उपमुख्यमंत्री

शहरीकरण हा अभिशाप नसून त्याचे सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे. शहरे ही विकासाची केंद्रे आहेत. शहरातच रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. स्वच्छतेत राज्य नेहमीच अग्रेसर आहे. महाराष्ट्र राज्य २०१७मध्ये हागणदारीमुक्त झाले. यापुढील काळात स्वच्छ आकांक्षी स्वच्छतागृहे परिवर्तन घडवून आणतील. कचरा व्यवस्थापनात आता सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अभियानातील कामांमध्ये उत्तरदायित्व महत्त्वाचे ठरणार आहे. या अभियानात सर्वांनी अत्यंत तळमळीने काम करावे. कामात पारदर्शकता ठेवावी. उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यावर आणि वापरण्यावर भर द्यावा. पीपीपी मॉडेलद्वारेही रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. यामध्ये खासगी संस्थांच्या सहभागावरही भर द्यावा लागेल. दोन वर्षांत आपल्याला शहरे कचरामुक्त करून शहरांचा पूर्णपणे कायापालट करायचा आहे. त्यादृष्टीने चांगल्या स्टार्टअपना यामध्ये नक्कीच संधी दिली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० – कचरामुक्त शहरे, तसेच घनकचरा आयसीटी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. अभियानाच्या अंतर्गत सहकार्य करणाऱ्या संस्थांशी सहकार्य करारांची देवाण-घेवाणही झाली. शहरांसाठी शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेबाबत स्पर्धेची घोषणाही करण्यात आली.

Share