विमा कंपन्यांनी ५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाका; कृषिमंत्र्यांचा इशारा

औरंगाबाद : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत

नैसर्गिक आपत्तीत निश्चित झालेल्या १०७३ कोटी रुपये नुकसान भरपाई पैकी फक्त ९६.५३ कोटी रक्कम ३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी आणि युनायटेड इंडिया इंश्युरन्स आणि इतर सर्व कंपन्यांनी तातडीने जमा करण्याच्या सूचना देत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकूण १६ आक्षेप घेतले आहेत. त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने भेटून कंपन्यांनी शंकेचे निराकरण करुन लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचनाही श्री.सत्तार यांनी दिल्या.

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून येथील ५ लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले असून उर्वरित २१ हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण संबंधित यंत्रणेने तातडीने करावे. लातूर आणि बीड जिल्ह्यातील तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी. उस्मानाबाद जिल्ह्यातील विम्यासंदर्भात सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विमा कंपनीने त्वरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा करावी, असेही ते म्हणाले.

प्रत्येक तालुक्यात एक व्यक्ती नेमून ऑफलाईन अर्ज देखील ऑनलाईन करुन घ्यावा. केवळ अतिवृष्टीमुळेच नाही तर सततच्या पावसाने देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाच्या पंचनाम्याप्रमाणे विमा कंपन्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावीच लागेल असा आदेश देत संबंधित अधिकाऱ्यांनी देखील विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करुन एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी असेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Share