‘शालेय विद्यार्थ्यांच्या ताटात ‘आंतरराष्ट्रीय दर्जाची माती’

लातूर : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महामार्गाच्या कूर्मगतीने होऊ घातलेले काम ज्येष्ठ नागरिक व रुग्णाच्या आरोग्याच्या मुळावर उठले आहे. शिवाय हजारो विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणात माती कालवले जात असल्याने नागरिकांत तीव्र संताप पसरला आहे.
मिनी मार्केट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान श्री देशिकेन्द्र विद्यालयासमोरील मिनी उड्डाण पुलाचे पाड़काम सुरु असून गेल्या तीन महिन्यापासून सुरु असलेले कामाची गती ही अतिशय संथ आहे. मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता व विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने मिनी उड्डाण पूल निर्माण करून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था सुकर करण्यात आली होती. परंतु काही राजकीय हेतुने या मार्गावरील पूल उभारणीनंतर अवघ्या बारा-तेरा वर्षातच पाडण्याचा घाट घातला गेला व हा मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा, या हेतुने स्थानिक आमदार  अमित देशमुख प्रयत्नशील आहेत.
मिनी पुलाचे पाड़काम सुरु होऊन तीन महिने कालावधी लोटला असून रस्ता कामामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धूळ उड़त आहे. याशिवाय अचानकपणे रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जातो. याचा परिणाम श्री देशिकेन्द्र विद्यालय, मारवाड़ी राजस्थान विद्यालय, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, केशरबाई भार्गव विद्यालय, बंकटलाल लाहौटी इंग्लिश स्कूल, सुरजकुंवरदेवी क्रियेटिव्ह किड्स इत्यादी शाळांच्या विद्यार्थ्यांवर तसेच या भागातील आठ-दहा रुग्णालये व हजारो रुग्णावर होत आहे.
शाळांना वीस दिवस सुट्टी असताना गुत्तेदारानेही सूटी घेतली आणि दिवाळीनन्तर शाळाबरोबरच पुन्हा दोन-तीन दिवसांपासून रस्ता काम सुरु करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे धुळीचे लोट उठून शाळांत विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यंतरात जेवणासाठी शाळेच्या प्रांगणात जमणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डब्याला आंतरराष्ट्रीय दर्जच्या रस्त्याच्या मातीचा तड़का बसत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, रहिवासी त्रस्त आहेत. पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अट्टाहासामुळे विद्यार्थी व नागरिकांची मुस्काटदाबी सुरु असून स्थानिक प्रशासन, मनपा, बांधकाम विभाग, आमदारांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
Share