महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होतंय?

मुंबई : वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. ‘महाराष्ट्र बंदची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय? असा सवाल सामनाच्या रोखठोक सदरातून विचारण्यात आला आहे.

शिवाजी महाराज ‘नायक’ नसते तर देशाच्या स्वातंत्र्य लढय़ास प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा घाट घातलाच नसता. टिळकांनी गणपती व शिवराय घरातून मांडवात आणले. शिवाजी-भवानीच्य नावानेच संयुक्त महाराष्ट्राचा लढादेखील पेटवला व जिंकला गेला. मुंबई महाराष्ट्रास मिळाली. शिवसेनेसारखे ज्वलंत राष्ट्रीय बाण्याचे संघटन तर शिवाजी राजांच्या प्रेरणेतूनच उभे राहिले. शिवराय कालबाहय झाले असते तर त्यांचे नाव कशाला कोणी घेतले असते?, असा प्रश्न सामनातून विचारण्यात आलाय.

सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे. तसे नसते तर महाराष्ट्राच्या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यास भाजपचे नेते व त्यांचे राज्यपाल धजावले नसते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांना ‘कालबाहय म्हणजे जुने पुराणे हिरो असे संबोधून वादळ ओढवून घेतले आहे. इकडे राज्यपाल शिवराय जुनेपुराणे झाले असे म्हणतात तर तिकडे भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी राजांनी औरंगजेबास तडजोडीसाठी पाच पत्रे पाठवली म्हणजे माफीच मागितल्याचा स्पस्ट करून महाराष्ट्राची मने दुखावली आहेत. या दोन लोकांनी शिवाजी राजांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे सरकार तोंड शिवून बसले. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपमानाच्या विरोधात साधा निषेध केला नाही. उलट राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा बचाव केला. असे आक्रित इंग्रजकाळातही घडले नव्हते. म्हणूनच काळ मोठा कठीण आला आहे असेच म्हणावे लागेल.

शिवरायांचा अपमान राज्यपालांनी पहिल्यांदाच केला नाही, याआधी तो वारंवार केला आहे. राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, ही मागणी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. अशा राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे हा राजद्रोहासारखा गुन्हा आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांची केलेली निंदा हा जर राजद्रोहासारखा गुन्हा ठरत असेल तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची निंदा हा राजद्रोहच म्हणायला हवा. दोन मुद्दे भाजपच्या नेत्यांनी मांडले, ते म्हणजे शिवाजी महाराज हे जुने झाले व छत्रपती हे नव्या युगाचे ‘नायक’ नाहीत. जे राज्य चारशे वर्षांनंतरही शिवाजी राजांच्या विचाराने चालले ते कालबाहय ठरवून भाजप व त्यांच्या लोकांना काय सांगायचे आहे?

Share