शिवभक्तांच्या भावना कळत नसतील तर उठाव होणारच – संभाजीराजे

मुंबई : भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का?, असा संतप्त सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट म्हटलं की, ‘भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!’ या ट्विटमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवताना संभाजीराजेंची भावना ही महाराष्ट्राची भावना असल्याचं म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींना हटविण्यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे. शिवाजीराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र यावं हीच भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने वादग्रस्त बोलणाऱ्यांविरोधात, त्यांना कमी लेखणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील जनतेने एकत्र यावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?
‘आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,’ असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.

Share