काम करण्याच्या वृत्तीतही बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री

मुंबई : आपल्या कामामुळे सर्वसामान्य माणसाला समाधान वाटले पाहिजे त्या काम करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच सुशासनासाठी वृत्तीतही बदल हवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केले. जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकला न्याय मिळेल असा विश्वास देणे गरजेचे असून नव्या इमारतीत येणार प्रत्येकजण समाधानाने परत जावा, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे  म्हणाले की, एखादं पद, अधिकार लाभला की  मी बरा, माझे कार्यालये बरे असं न  समजता  मिळालेल्या अधिकाराचा, पदाचा समाजासाठी वापर करणे गरजेचे आहे.  केवळ इमारतीचे नुतनीकरण करून चालणार नाही. काम करण्याच्या वृत्तीतही बदल करणे आवश्यक आहे. सुशासनासाठी कार्याच्या पद्धतीत बदल करणे, लोकाभिमूख कार्याची दिशा निश्चित होणे आवश्यक असुन या नूतन इमारतीत येऊन संबंधित अधिकाऱ्यांना  भेटल्यानंतर लोक हसत बाहेर गेले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत या विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्याबरोबरच आवश्यक असलेल्या सोयी-सुविधां उपलब्ध करुन देण्यात येतील. जिथे जिथे सरकारची मदत आवश्यक तिथे प्रत्येक पावलावर शासन तुमच्यासोबत असुन सर्वसामान्य माणसाला समाधानी ठेवा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री  यांनी यावेळी व्यक्त केली.

राजेश टोपे यांच्या कार्याचं कौतुक 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लोक  कुटुंबप्रमुख म्हणून माझे कौतूक करतात. पण  शासन-प्रशासनाच्या, जनतेच्या सहकार्याशिवाय काही होत नाही. या सर्वांच्या सहकार्यामुळेच कोविड काळात राज्याचं काम देशात उजवं ठरलं. राज्यात अनेक कोविड केंद्र उभारली, चाचणी केंद्र उभारली गेली.  कोविड काळात जास्तीत जास्त चांगली सेवा सर्वसामान्य माणसाला देता आल्यानेच जनतेचे प्राण आपण वाचवू शकलो. स्वत: राजेश टोपे या कामात पाय रोवून उभे राहिले. त्यामुळे  या कामावर होणाऱ्या आरोपांना घाबरू नये.

जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. त्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे, धर्मादाय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी, धर्मदाय वकील संघटनचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Share