लाल महालात ‘लावणी’चे शूटिंग करणे पडले महागात; अभिनेत्री वैष्णवी पाटीलसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : इंस्ट्राग्रामवर रिल्स तयार करण्यासाठी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात लावणी नृत्य सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लाल महालाची बदनाम केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखेर या प्रकरणात पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

संभाजी ब्रिगेडने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात अनेक पर्यटक राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत लाल महाल बंद ठेवला होता. तरीही लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारित रिल्सचे शूटिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे.

कुलदीप बापट यांनी संबंधित गाण्याचे शूटिंग केले, तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी नृत्य केल्याचे समोर आले आहे. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी लाल महालमध्ये ही लावणी करण्यात आली आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे.

ऐतिहासिक लाल महालमध्ये लावणीचा व्हिडीओ शूट केल्यामुळे संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर यांनी केली होती. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करीत संताप व्यक्त केला होता.

आता या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वैष्णवी पाटीलसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रखवालदार राकेश विनोद सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Share