के. के. यांच्या आठवणीत चाहते भावूक; देशभरातून शोक व्यक्त

मुंबई : जवळपास २ दशकं आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून बॉलिवूडवर यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ के. के. यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. के. के. हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक होता. त्यांची गाणी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होती. अशा या अत्यंत लोकप्रिय गायकाच्या निधनामुळे चाहते दु:खी झाले आहेत. चाहते के. कें. नी गायलेली आपली आवडती गाणी सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धांजली वाहत आहेत. अनेकांनी के. के. यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

के. के. यांचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत झाला होता. के. के. म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांच्या स्वराची जादू सगळ्या जगावर पडली होती. आता ते सूरच नि:शब्द झाले आहेत. ३१ मेच्या रात्री कोलकाता येथील नझरूल मंच येथे एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये के. के. हे परफाॅर्म करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि पुढील काही तासांत त्यांचे निधन झाले. के. के. यांच्या अकाली निधनाबद्दल चाहते सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त करत आहेत. मंगळवारी कोलकाता येथील अखेरच्या शोमध्ये के. के. यांनी गायलेल्या १८ गाण्यांची यादी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. के. के. यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अभिनेता अक्षय कुमार, वरुण धवन, मृणाल ठाकूर, अभिषेक बच्चन, रश्मी देसाई, गायक राहुल वैद्य आणि स्वरा भास्करपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी के. के म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
“प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के.के. यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून फार दु:ख झाले. त्यांची गाणी ही सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये लोकप्रिय ठरली. त्या सर्व वयोगटातील व्यक्तींच्या भावनांचे प्रतिबिंब होते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम राहिल. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्याप्रती मी दु:ख व्यक्त करतो. ओम शांती”, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

“के.के.च्या दुःखद निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. हे आपलंच नुकसान आहे. ओम शांती”, असे म्हणत अभिनेता अक्षय कुमारने के.के. यांना श्रद्धांजली वाहिली.

“आमच्या लाडक्या के.के.च्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर फार दु:ख झाले. तसेच एक जबरदस्त धक्काही बसला. तो एक असा संगीतकार आहे, ज्याच्या आवाजाने मी माझ्या बालपणीचा बराच काळ घालवला”, असे अभिनेता वरुण धवनने म्हटले आहे.

अभिषेक बच्चन याने के. के. यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे की, “ही खूप धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. केके, तुम्ही तुमचे टॅलेंट आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण तू फार लवकर गेलास”, असे अभिषेकने म्हटले आहे.

५३ वर्षीय गायक के. के. यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणना होत असे. त्यांनी अनेक भारतीय भाषांमधील गीतांना आपला आवाज दिला आहे. आतापर्यंत त्यांनी २०० हून अधिक सुपरहिट गाणी गायली आहेत. ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘यारो’ या गाण्याने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रहे’ हे के.कें. चे गाणे खूप गाजले. के. के. यांनी रोमॅण्टिक गाण्यांसह पार्टी साँगपर्यंतची सर्व गाणी गायली आहेत. के.के. यांनी १९९६ मध्ये ‘माचिस’ सिनेमातील ‘छोड आये हम वो गलीयां’ हे गाणे गाऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘तडप तडप के’, ‘बर्दाश्त नहीं कर सकता’, ‘दस बहाने’, ‘आंखों में तेरी’, ‘तू ही मेरी शब है’, ‘खुदा जाने’ आणि ‘जिंदगी दो पल की’ अशी एकाहून एक सरस गाणी गायली होती. के.के. हे एक असे गायक होते जे प्रत्येक शैलीतील आणि प्रत्येक भावनेचे गाणी सहज गाऊ शकत होते. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे के.के. यांनी कधीही संगीताचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण घेतले नव्हते.

१ कोटीची ऑफर देऊनही के. के. नी गायला दिला होता नकार

के. के. यांचे संगीतावर खूप प्रेम होते. ते आपल्या प्रत्येक गाण्याला इतके मनापासून गायचे की, त्यांचा आवाज गाणं ऐकणाऱ्याच्या मनाचाच थेट ठाव घ्यायचा. के. के. बॉलिवूडमधील दिग्गज गायकांपैकी एक म्हणून ओळखले जात असत. त्यांना सिनेमांसोबतच वेगवेगळ्या कॉन्सर्टसाठी आणि इव्हेंट्ससाठी गाण्याची ऑफर्स दिली जायची; पण त्यांनी इतर गायकांसारखे कधीच कुठल्या बड्या लग्नाच्या पार्टीत गाणं पसंत केले नाही. के. के. यांना एकदा मुलाखतीत विचारले होते की, ‘कधी तू गायक म्हणून कोणाची ऑफर स्वीकारायला नकार दिला आहेस का?’ त्यावर के. के. म्हणाले होते की, ”हो, मी लग्न सोहळ्यात गाणं गायला नेहमीच नकार देतो, मग मला १ करोड रुपये कोणी ऑफर केले तरी माझा निर्णय बदलत नाही”. कितीतरी गायक असे आहेत, जे गाण्यासोबत अभिनयाची हौसही भागवतात. के. के. यांनासुद्धा जेव्हा अभिनयाची ऑफर देण्यात आली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, ”कृपया, अभिनय माझ्यापासून लांबच ठेवा. मी पी-नट्ससाठी अॅक्टिंग करणार नाही. काही वर्ष आधी मला सिनेमा ऑफर झाला होता; पण मी नकार दिला होता” असेही के. के. त्यावेळी म्हणाले होते.

अनेक गाणी अजरामर
के. कें. नी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. ते त्यांच्या पिढीतील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी ‘प्यार के पल’ हे गाणं गावून प्रत्येक तरुणाच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते. त्यांच्या १९९९ मध्ये आलेल्या ‘पल’ या अल्बमला संगीतप्रेमींसोबतच संगीततज्ञांनी भरभरून दाद दिली होती. २००७ मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ चित्रपटातील ‘लबों को’ या रोमँटिक गाण्यालाही के.कें. नी आपला आवाज दिला आहे. त्यांनी हे गाणं इतके सुंदर गायलेय की, हे गाणं ऐकून तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही. ‘माचिस’ चित्रपट हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट तर हिट झालाच; पण या चित्रपटातील ‘छोड आये हम वो गलीयाँ’ हे गाणेही प्रचंड गाजले. आजच्या काळात लोक चित्रपटाचे नाव विसरू शकतात; पण हे गाणे विसरत नाहीत. इमरान हश्मीच्या ‘द ट्रेन’ चित्रपटातील ‘बिते लम्हे’ हे के. कें. नी गायलेले गाणे आजही प्रसिध्द आहे. ‘मेरा पहला पहला प्यार’ हे के. कें. नी गायलेले सदाबहार गाणे आहे.

Share