मुंबई : अभिनेते कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत भारतात शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला असून, आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात २०० कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे. या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे कमल हासन आनंदित झाले आहेत. त्यांनी ‘विक्रम’ चित्रपटाच्या टीममधील काही व्यक्तींना लाखो रुपयांचे गिफ्ट दिले आहे. त्याचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.
कमल हासन यांनी ‘विक्रम’ चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना कोट्यवधी रुपये किमतीची कार भेट दिली आहे. तसेच या चित्रपटातील त्यांचा सहकलाकार सूर्या याला महागडे रोलेक्सचे घड्याळ गिफ्ट म्हणून दिले आहे. सोनेरी आणि पांढरी रंगसंगती असलेल्या या घड्याळाची किंमत ४७ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ‘विक्रम’ या सिनेमात सूर्या याने अवघ्या ५ मिनिटांची पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे; परंतु त्या भूमिकेतही त्याने आपली छाप उमटवली आहे. ‘विक्रम’ ला मिळालेल्या यशाने आनंदित झालेल्या कमल हासन यांनी सूर्याला महागडे घड्याळ भेट म्हणून दिले. याची माहिती खुद्द सूर्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करून दिली आहे. हे फोटो शेअर करत सूर्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘असे क्षण आयुष्याला समृद्ध आणि आनंदित करतात. अण्णा, तुम्ही दिलेल्या रोलैक्स घड्याळासाठी खूप खूप आभार.’ सूर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कमल हासन त्याच्या हातावर घड्याळ लावताना दिसत आहेत.
A moment like this makes life beautiful! Thank you Anna for your #Rolex! @ikamalhaasan pic.twitter.com/uAfAM8bVkM
— Suriya Sivakumar (@Suriya_offl) June 8, 2022
सूर्याने या चित्रपटासाठी केवळ एक रुपया मानधन घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावेळी आपण ही भूमिका फक्त कमल हासन यांच्या प्रेम आणि आदरापोटी केल्याचे सांगितले. कमल हासन यांनी सूर्याच्या या प्रेमाची जाण ठेवत त्याला हे मोठे गिफ्ट दिले आहे. कमल हासन यांनी ‘विक्रम’ सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल एक व्हिडीओ शेअर करत आभार मानले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणाऱ्या सूर्याचे खास आभार मानले आहेत. तसेच ‘विक्रम’च्या पुढच्या फ्रेंचाईजीमध्ये सूर्याची भूमिका मोठी असेल, असे आश्वासनही दिले आहे.
वास्तविक ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने घसघशीत कमाई केली आहे. लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कमल हासन प्रमुख भूमिकेत असून, त्यांच्यासोबत विजय सेतुपती, फहाद फासिलसह सुपरस्टार सूर्या याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. ‘विक्रम’ हा सिनेमा सुपरहिट ठरल्यामुळे कमल हासन भारावून गेले आहेत. यामुळेच कमल हासन यांनी ‘विक्रम’ हा चित्रपटाच्या दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्यासह सहकलाकारांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर चित्रपटाच्या १३ सहाय्यक दिग्दर्शकांना कमल हासन यांनी बाईक गिफ्ट केली आहे. सहाय्यक दिग्दर्शकांना गिफ्ट देत असतानाचा कमल हासन यांचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी चित्रपटाच्या टीमवर केलेला गिफ्टचा वर्षाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Thank you so much Aandavarey @ikamalhaasan 🙏🏻 ❤️❤️❤️ pic.twitter.com/h2qZjWKApm
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) June 7, 2022
कमल हासन यांनी ‘विक्रम’चे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना कोट्यवधीची कार भेट म्हणून दिली आहे. लोकेश कनगराज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कमल हासन आणि त्यांनी दिलेल्या कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच कमल हासन यांचे आभारदेखील मानले आहेत. कमल हासन यांचे आपल्या आवडत्या अभिनेत्याच्याप्रति असलेले प्रेम आणि त्यांचा दिलदारपणा पाहून नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडच्या चित्रपटांना मागे सारून टॉलिवूडमधील चित्रपटांनी आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राईज’, राजामौली यांचा ‘आरआरआर’ आणि यशच्या ‘केजीएफ २’ या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम स्थापित केले आहेत. त्यात आता कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाने दोनशे कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘विक्रम’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटापुढे बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ फिका पडल्याचे दिसून आले आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने कमाईचे वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर करण्याचा सपाटा चालवला आहे.
https://t.co/zrQRWQN1Ta pic.twitter.com/dSi5jTXkVc
— Ramesh Bala (@rameshlaus) June 7, 2022