‘ईडी’ कडून कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यावर आरोपपत्र दाखल

बंगळुरू : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे. डी.के. शिवकुमार यांच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा कोणताही हिशेब नसल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे.

आयकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ‘ईडी’ने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर बाहेर आहेत. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सप्टेंबर २०१८ मध्ये डी. के. शिवकुमार, ए. हौमंथैया, नवी दिल्लीतील कर्नाटक भवनचे कर्मचारी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. आयकर विभागाने शिवकुमार आणि इतरांविरुद्ध बंगळुरूच्या न्यायालयात कथित करचोरी आणि हवाला व्यवहारांसाठी दाखल केलेल्या आरोपपत्रावर हा खटला आधारित होता.

काय आहे नेमके प्रकरण?
आयकर विभागाने शिवकुमार आणि त्यांचे सहकारी एस. के. शर्मा यांच्यावर तीन अन्य आरोपींच्या मदतीने हवाला चॅनेलद्वारे नियमितपणे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी पैशाची वाहतूक केल्याचा आरोप केला आहे. ६० वर्षीय शिवकुमार यांना २०१९ मध्ये ‘ईडी’ने या प्रकरणात अटक केली होती आणि एजन्सीने त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक लोक आणि सहकाऱ्यांची चौकशी केली होती.

Share