नवी दिल्ली : भारतीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याला दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. यासिन मलिकच्या विरोधातील आरोप सिद्ध झाले असून, न्यायालयाने मलिकच्या आर्थिक स्थितीचा लेखा-जोखादेखील सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ मे रोजी होणार आहे.
दिल्लीतील एनआयएच्या न्यायालयात यासीन मलिकने काश्मीर खोऱ्यात दहशतवादासाठी निधी पुरवल्याचे आरोप स्वीकारले होते, त्यानंतर आज न्यायालयाने मलिकला दोषी ठरवले आहे. एएनआयने याबाबत ट्वीट केले आहे.
#WATCH | Delhi: Separatist Yasin Malik being brought out of NIA Court after hearing in terror funding case. The court convicted him in the matter. Argument on sentence to take place on 25th May. pic.twitter.com/33ue61lDaH
— ANI (@ANI) May 19, 2022
यासीन मलिक सध्या तुरुंगात असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १६ (दहशतवाद कायदा), कलम १७ (दहशतवादासाठी निधी), कलम १८ (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम २० (दहशतवादी टोळीचा सदस्य) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. याशिवाय त्याच्यावर त्याच्यावर युएपीए, १२० ब (गुन्हेगारी कट) आणि देशद्रोहाचाही आरोप आहे. या आरोपांना यासीन मलिकने आव्हान न देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यासीन मलिकने एकप्रकारे आपल्या गुन्हेगारी कृत्यांची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.
काश्मीरमधील तरुणांना चिथावणी देण्यापासून हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची हत्या, हाफिज सईदसोबतची भेट, तत्कालीन गृहमंत्री मोहम्मद सईद यांच्या मुलीचे अपहरण, असे अनेक आरोप यासीन मलिकवर आहेत.
हे १० नेतेही निशाण्यावर
१० मे रोजी झालेल्या सुनावणीत फारुख अहमद डार ऊर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्रत आलम, मोहम्मद यूसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वटाली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल राशिद शेख आणि नवल किशोरी कपूरसह अन्य काश्मिरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या विरोधात औपचारिकरित्या आरोप सिद्ध करण्यात आले आहेत. ‘लष्कर-ए-तोयबा’चे संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे प्रमुख सय्यद सलाहुद्दीनविरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. यात त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.