महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ – राहुल गांधी

बुलडाणा : महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद व भरभरून प्रेम दिले. यात्रेत बहुसंख्येने लोक बरोबरीने चालले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री संत साईबाबा व श्री संत गजानन महाराज या संत-महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाली. पुरोगामी महाराष्ट्रातून मोठी ऊर्जा मिळत गेली, या शब्दांत खा. राहुल गांधी यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रात भावना व्यक्त केल्या.

राहुल गांधी यांचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरु झाला आणि शिवाजी महाराजांचा मातृ जिल्हा, (जिजाऊ मासाहेबांचा जन्म जिल्हा) बुलढाणा येथून ती मध्य प्रदेश मध्ये जात आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संताच्या विचारापासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा, तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नम्रपणे वाटचाल करत आहोत.

महाराष्ट्रातील जनतेने या यात्रेला प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिले. आमच्यासोबत बरोबरीने चालले, लाखोंच्या संख्येने नांदेड आणि शेगाव येथील सभेमध्ये सहभागी झाले. या सर्व अबालवृद्ध, युवक, महिला यांच्या प्रेमाने आमचे हृदय, मन भरून आले आहे.

महाराष्ट्रात आम्हाला भारतातील समृद्ध विविधतेचे दर्शन झाले. या यात्रेदरम्यान, आम्हाला अनेक ऐतिहासिक मंदिरांना गुरुद्वारांना भेटी देता आल्या तसेच विठ्ठलाचे पाईक वारकरी, बौद्ध भिक्कू आणि सुफी संप्रदायातील लोक यांच्यासोबत चालताना मनस्वी आनंद झाला. आम्ही भगवान बिरसा मुंडा यांची १५७ वी जयंती देशातील इतर आदिवासी बांधवांप्रमाणे साजरी केली. प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी महिला शक्तींना घेऊन (शक्तीमार्च) महिला सन्मानाचा संदेश दिला तसेच या प्रसंगी हजारो आदिवासी महिलांशी संवाद साधता आला व १० हजार महिलांच्या मेळाव्याला संबोधित केले, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही अशा लोकांचे ऐकले जे कठोर परिश्रम करतात परंतु त्यांच्या तपस्यांचे फळ त्यांना मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न, त्याची कारणमिमांसा करता असे लक्षात आले की, कृषी साहित्याच्या किंमतीत झालेली प्रचंड भाववाढ, शेतमालाच्या भावात असलेली अनियमितता आणि फसलेली पीकविमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलेले आहे, हे पाहून मन व्यथित झाले. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हतोत्साहीत झालेले, आपल्या स्वप्नाचा चुराडा झालेले पाहिले. आदिवासी समुदाय हा या देशाचा मुलनिवासी आहे आणि त्याच्या अधिकारावर गदा आलेली आहे. वन हक्क जमीन २००६ चा कायदा कशा पद्धतीने पायदळी तुटवला जात आहे हे सुद्धा लक्षात आले. या सगळ्या समस्यांची कारणमिमांसा करताना असे लक्षात आले की, भाजपाचे काही लोकांच्या हातामध्ये सता आणि संपत्ती सिमित ठेवण्याचे धोरण याला कारणीभूत आहे. एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात संस्कृती, धर्म, जात आणि भाषा याचा वापर करून उभे करून संघर्ष उभा करण्याच्या भाजपच्या नीतीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.

 

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी शाहू, फुले, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हा राहिलेला आहे आणि हा जाज्वल्य विचार देशाला नेहमी दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकवण्याचा प्रयत्न अनेक नागरी समुदाय, पुरोगामी विचारांचे कलाकार, साहित्यिक, सिने क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र हे करत आहेत आणि त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहिन. या प्रवासात वृत्तवाहिन्या व प्रिंट माध्यमातील माध्यम कर्मींच्या सहभागाकरीता मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो.

आम्ही अतिशय विनम्रतापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देत आहोत. आपण दिलेले प्रेम, प्रचंड मोठा असा प्रतिसाद आणि आपण केलेले आदरातिथ्य याने आम्हाला एक नवीन ऊर्जा दिली आहे.

धन्यवाद !

राहुल गांधी

Share