तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही – संजय राऊत

मुंबई : राज्यातील मिंधे सरकार लवकरात लवकर घालवलं पाहिजे नाही तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ठाकरे गटाचे खा. संजय राऊत म्हणाले की, राज्यात एक अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र नीट समजलेलाच नाही. ते अनेक वर्षे संबंधित खात्याचे मंत्री होते. तरी त्यांनी आजपर्यंत सीमावासियांच्या कोणत्या प्रश्नांना वाच फोडली, याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करु, असे सांगितले. त्यानंतर लगेचच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितला. सीमाभागातील गावे महाराष्ट्रात पुन्हा समाविष्ट करण्याचे सोडाच पण आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही वेस ओलांडून सांगलीतील गावांवर दावा सांगितला आहे. याचा अर्थ इतकाच की, कर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्त्वाखालील मिंधे सरकार आहे. यापैकी कोणाला मुंबई तोडायची आहे. कोणाला महाराष्ट्रातील जिल्हे आणि गावं तोडायची आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरु आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आम्ही या गावांना पाणी देऊन मदत केली आहे. या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. कर्नाटक सरकार या ठरावाचा गांभीर्याने विचार करत आहे, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले.

Share