राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यात १ कोटी ५ लाखाचा मद्यसाठा जप्त

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागा कडून पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत १ कोटी ५ कोटी ७ हजार ५२० हजाराचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत यांनी दिली. वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार आणि देविदास विकास भोसले अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर हॉटेल शांताई समोरील रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क तळेगाव पथकाने सापळा रचून गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक आडवला. यावेळी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्य आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हा ट्रक ताब्यात घेतला. क्र.एम एच ४७ एफ – ६१३८ या क्रमांकाचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली आहे.

या ट्रकमध्ये रिअल व्हिस्की ७५० मि.लीच्या ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या, रिअल व्हिस्की १६० मि.लीच्या ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.लीच्या ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकूण १ हजार २६७ खोके जप्त करण्यात आले. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लाख ७ हजार ५२० रुपये इतकी आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी काही माहिती मिळते का? याबाबत पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी काही धागे-दोरे हाती लागतात का? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Share